मिशन ‘महामिलावट’ला देशात ‘खिचडी’सरकार आणायचंय !- पंतप्रधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। कोडर्मा

लोकसभा निवडणुकीत केवळ राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पराभूत करण्याच्या उद्देशाने लोकसभा निवडणूक लढवणाऱया मिशन महामिलावटने देशात तुकडय़ा तुकडय़ांचे ‘खिचडी’ सरकार सत्तेवर आणण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. या सरकारची सूत्रे काँग्रेसच्या हाती असतील आणि काँग्रेसची खप्पामर्जी झाली की दर दोन वर्षांनी देशाचा पंतप्रधान बदलण्याची परंपरा राबवायची हा लोकशाहीला मारक अजेंडा सत्तेवाचून तळमळणाऱया काँग्रेसच्या मनात आहे, अशी झोंबरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जमुआ येथील भाजपच्या प्रचारसभेत बोलताना केली.

झारखंडच्या कोडर्मा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार अन्नपूर्णादेवी यांच्या प्रचारासाठी भाजपने जमुआ येथे आयोजिलेल्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. ते म्हणाले, विरोधकांच्या महामिलावटी महाआघाडीला देशात स्थिर आणि समर्थ सरकार नको आहे. कारण सत्ता स्थापन करून पुन्हा आपल्या आवडीचा आणि आपल्या दबावाखाली राहणारा पंतप्रधान सत्तेवर आणण्याचा काँग्रेसचा एककलमी कार्यक्रम आहे. काँग्रेस इतका कमकुवत झालाय की स्वबळावर सरकार आणण्याचे सामर्थ्याचा काँग्रेसमध्ये उरलेले नाही. म्हणूनच अन्य छोटय़ा पक्षांच्या कुबडय़ांवर पुन्हा केंद्रात सत्तेवर येण्याचे दिवास्वप्न काँग्रेस पाहत आहे. त्यांना जनतेच्या सुख-दुःखाचे सोयरसुतक काँग्रेसला अथवा अन्य विरोधी पक्षांना नाही. मतदारांना व्होट बँक म्हणून वापरणाऱया या पक्षांना आता देशातील जनताच चांगला धडा शिकवेल, असा हल्लाबोल मोदी यांनी चढवला.

मोदी तर जिंकलेत, या अफवेवर विश्वास ठेवू नका

‘मोदी तर जिंकणारच आहेत. त्यांना मतदान करण्याची गरज नाही’, अशा अफवा विरोधकांकडून पसरविल्या जात आहेत. त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका, या अफवेला बळी पडण्यापेक्षा मोदींना आणखी मतदान करा आणि प्रचंड बहुमताने निवडून द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तीन टप्प्यांतील मतदानानंतर विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. चार टप्प्यांनंतर त्यांचा पराभव अटळ आहे. आता ते मोदी जिंकणारच आहेत. त्यांना मतदान करण्याची गरज नाही. अशा अफवा विरोधक पसरवित आहेत. त्यावर मोदी यांनी हे भाष्य केले.