जिया खान आत्महत्या प्रकरण : सूरज पांचोलीची निर्दोष सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्या प्रकरणात दहा वर्षांनंतर विशेष सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी अंतिम निकाल जाहीर केला. जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या अभिनेता सूरज पांचोलीला सबळ पुराव्यांअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. सरकारी पक्ष ठोस पुरावे सादर करण्यात अपयशी ठरला, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. दरम्यान, विशेष सीबीआय न्यायालयाच्या निर्णयाला जियाची आई रबिया खान या मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत.

3 जून 2013 रोजी जिया ही जुहूतील घरी गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली. त्यादिवशी तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली होती. त्याआधारे जियाला तिचा प्रियकर सुरज पांचोलीने आत्महत्येस प्रवृत्त केले, असा आरोप करीत पोलिसांनी सुरजला अटक केली. 2021 मध्ये विशेष सीबीआय न्यायालयाकडे हा खटला वर्ग केला गेला. या खटल्यातील मुख्य फिर्यादी साक्षीदार जियाची आई राबिया खान हिने हे प्रकरण आत्महत्येचे नसून हत्येचे आहे, असा दावा न्यायालयात केला होता. सुरज पांचोली हा जियाचा शारीरिक छळ करत असे व शिवीगाळ करायचा, असे रबिया यांनी न्यायालयाला सांगितले होते. विशेष सीबीआय न्यायाधीश ए. ए. सय्यद यांच्यासमोर दिड वर्षे या खटल्याची सुनावणी झाली. 21 एप्रिलला दोन्ही पक्षांचा अंतिम युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. तो निर्णय शुक्रवारी जाहिर करण्यात आला.

न्यायालयाने काय म्हटले?

– आरोपी सुरजविरोधातील पुरावे अस्पष्ट आणि सामान्य स्वरूपाचे आहेत. या पुराव्यांवरून सूरजने जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे कुठेही सिद्ध होत नाही.

– 3 जून 2013 रोजी जियाला आत्महत्या करण्यास सूरजची कृती कारणीभूत ठरली हे दाखवून देणारा एकही पुरावा सरकारी पक्ष सादर करू शकलेला नाही.

– रबिया खान यांनी जियाची आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला. परंतु शवविच्छेदन करणाऱया वैद्यकीय तज्ञाने दिलेल्या पुराव्यांवरून जियाला फासावर लटकवले गेल्याचे स्पष्ट होत नाही. वैद्यकीय पुराव्यांवरून जियाने स्वतः गळफास घेतल्याने तिचा मृत्यू झाल्याचे उघड होते.