
कोविड संकटाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली ती कोणालाच जमली नसती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासारखा मुख्यमंत्री होणे नाही, अशा शब्दांत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कामाचे कौतुक केले. शिवसेनेच्या शाखांमधून ज्या पद्धतीने गोरगरीबांची कामे केली जातात तशाच प्रकारचे काम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही करावे, असे आवाहन आव्हाड यांनी केले.
डोंबिवली पूर्वेत आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. त्या वेळी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाच्या पद्धतीचा संदर्भ देत काम कसे करायचे हे सांगितले. ते म्हणाले की, महापालिकेच्या निवडणुका लवकरच लागतील. त्यामुळे जनतेपर्यंत जायला पाहिजे म्हणून भिवंडीला गेलो होतो. आज डोंबिवलीत आलो आहे. कल्याण तालुक्यात खरी पक्षाची वाट गणेश नाईक यांनी लावली. त्यांनी रणनीती आखत पक्ष पोखरला. त्यानंतर जी गळती झाली त्यातून आपण अजून सावरलो नाही. गीतकार जावेद अख्तर यांनी केलेल्या विधानाबाबत प्रत्येकाला वैचारिक स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे अख्तर जे काही बोलले याबाबत आश्चर्य वाटत नाही.































































