तुमच्यात धमक होती तर काढा ना पक्ष, कोणी अडवलं होतं? ‘तो’ व्हिडीओ शेअर करत आव्हाडांचे अजितदादांना आव्हान

अजित पवार यांनी वेगळा मार्ग निवडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. एका बाजूला अजित पवार तर दुसऱ्या बाजूला शरद पवार. हा वादा सध्या निवडणूक आयोगासमोर असून पक्ष, चिन्ह कोणाचे याचाही फैसला लवकरच होईल. ही सुनावणी सुरू असतानाच अजित पवार यांनी कर्जतमधील मेळाव्यात धक्कादायक गौप्यस्फोट केले. याला आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांचा एक जुना व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. शिवसेना फुटली आणि एकनाथ शिंदेंसह 40 आमदार गद्दारी करून भाजपसोबत गेले तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. यात ते एकनाथ शिंदे त्यांच्यात धमक असेल तर त्यांनी नवीन पक्ष काढावा, असा सल्ला देताना दिसताहेत.

अजित पवार यांचा हाच व्हिडीओ शेअर करत जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना नवीन पक्ष आणि चिन्ह घेऊन स्वत:चे कर्तुत्व सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे. जितेंद्र आव्हाड म्हणतात, दादा, तुम्ही महाराष्ट्राला कायम स्वत:ची ओळख करुन देताना म्हणत आलात की, मी दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे, प्रसंगी वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी! शिवसेना फुटल्यानंतर केलेल्या भाषणांत आजचे मुख्यमंत्री ज्यांच्या मंत्री मंडळात आपण उपमुख्यमंत्री आहात त्यांना दिलेला हा सल्ला होता. या सल्ल्याप्रमाणे आपण वागलात तर महाराष्ट्रात आपले कौतुक होईल.

शरद पवारांनीच मला भाजपसोबत जाण्यास सांगितले, अजित पवारांचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जन्म शरद पावरांनी दिला. त्याचं पालन पोषण ही शरद पवारांनी केलं. त्याचं संगोपन पुढे पवारांनीच केलं. राष्ट्रवादी पक्ष वाढला हा देखील शरद पवारांमुळे आणि तो फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशभरात. मग, जसं आपण म्हटलात तसं घ्याना आणि एक नवीन पक्ष काढा, नवीन निशाणी घ्या आणि स्वत:चं कर्तुत्व सिद्ध करुन दाखवा, असे आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना दिले.