पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेली सापडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

उपचारानिमित्त जे. जे. रुग्णालयात दाखल असताना तेथून पळण्याची संधी मिळताच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेल्या महिला आरोपीला पकडण्यात जे. जे. मार्ग पोलिसांना यश आले आहे. शबाना अन्सारी (40) असे त्या महिलेचे नाव आहे.

शबाना हिला पोक्सोच्या गुह्यात काशिमीरा पोलिसांनी अटक केली आहे. उपचारानिमित्त तिला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच शबाना हिने संधी साधत रुग्णालयातून पळ काढला. त्यामुळे याप्रकरणी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक घेवडेकर, ढगे यांनी त्या महिलेचा शोध सुरू केला. खबऱ्यांचे जाळे पसरवून तांत्रिक बाबींनी तपास सुरू केल्यावर पोलिसांना चकवून पळालेली महिला शबाना ही गोवंडी येथे लपून बसली असल्याची खबर मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गोवंडीमध्ये सापळा रचून शबानाला ताब्यात घेतले.