
जम्मू-कश्मीर क्रिकेट असोसिएशनमधील (जेकेसीए) आर्थिक घोटाळा आणि मनी लॉण्डरिंग प्रकरणाचा तपास करणाऱया अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला आणि अन्य संबंधितांची 11.86 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्याचे शनिवारी अधिकाऱयांनी सांगितले.‘ईडी’ने ‘पीएमएलए’ कायद्यान्वये जम्मू आणि श्रीनगर येथील अब्दुल्ला यांच्या घरासह अन्य मालमत्ता जप्त केल्या. त्यामध्ये दोन स्थावर मालमत्ता, एक व्यापारी मालमत्ता आणि अन्य तीन भूखंड यांचा समावेश आहे. त्यांचे बाजारमूल्य 60-70 कोटी रुपये इतके आहे. या कारवाईमुळे गुपकार गँगच्या माध्यमातून जम्मू-कश्मीरातील रद्द झालेले 370 कलम पुन्हा आणण्यासाठी आंदोलन करणाऱया फारुख यांना मोठा झटका बसला आहे.


























































