
सामना प्रतिनिधी, न्हावाशेवा
शिक्षण, नोकरी व राजकारणात आरक्षण देत महिला सक्षमीकरणासाठी सरकार प्रयत्न करत असताना जेएनपीटीतील चौथे बंदर बीएमसीटीपीएएलने मात्र 17 प्रकल्पग्रस्तांना त्या केवळ मुली आहेत म्हणून नोकरी देण्यास टाळाटाळ करत असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकल्पग्रस्त मुलींनी भरती होण्यासाठी लागणाऱ्या सर्व परीक्षा तसेच चाचण्या उत्तीर्ण केल्या आहेत. एकढेच नाही तर भरती प्रक्रियेतील शेवटची मेडिकल चाचणीदेखील उत्तीर्ण होऊनही त्यांना कामावर सामावून घेतले जात नसल्याने कशाला ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’चा ढोल बडवणाऱ्या मोदी सरकारचे महिलाविषयीचे हेच आहे का धोरण, असा सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच प्रशासनाच्या या मनमानी संतापजनक कारभाराविरोधात रक्षाबंधननंतर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
सावित्रीच्या लेकींचा अपमान
जिजाऊ-सावित्रीच्या लेकी आज सर्वच क्षेत्रांत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर त्यांच्यापेक्षाही पुढे झेपावल्या आहेत. मुली, महिला म्हणून त्या कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत. असे असतानाही या प्रकल्पग्रस्त मुलींना नोकऱ्या नाकारण्यात येत असून हा सावित्रीच्या लेकींचा अपमान आहे. त्याविरोधात तीव्र लढा उभारणार असून प्रसंगी 4 सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणालाही बसणार असल्याचा इशारा देण्यात आला. यावेळी आमदार मनोहर भोईर, रायगड जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, जेएनपीटी विश्वस्त रवी पाटील, कामगार नेते भूषण पाटील, कामगार नेते सुरेश पाटील, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, उरण पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, प्रकल्पग्रस्त मुली व त्यांचे पालक उपस्थित होते.
जेएनपीटीने बीएमसीटी कंपनीसोबत केलेल्या करारात प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याची तरतूद आहे. त्यानुसार ऑपरेटर, मॅकेनिकल इंजिनीयर, इलेक्ट्रीक इंजिनीयर या पदांसाठी प्रकल्पग्रस्त 17 मुलींनी 12 जून 2017 रोजी ऑनलाइन अर्ज केले. त्यानंतर घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. जुलै 2017 मध्ये शारीरिक आणि तोंडी परीक्षेचे टप्पे पार केल्यानंतर मेडिकल टेस्टही घेण्यात आली, त्यातसुद्धा या मुली पात्र ठरल्या. भरती करताना कंपनीने परप्रांतीयांसह 125 जणांना नोकरी दिली. मात्र या प्रकल्पग्रस्त मुलींना नोकरीपासून वंचित ठेवण्यात आले. केवळ मुली आहेत म्हणून जेएनपीटी आणि भारत मुंबई कंटेनर टर्मिनल (बीएमसीटी) मुजोर व्यवस्थापन नोकरी नाकारत असतील तर या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी 28 ऑगस्टपासून तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार या मुलींनी केला असल्याचे आज पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले.
summary- JNPT denied job to 17 women

























































