
सामना प्रतिनिधी। न्हावाशेवा
उरणच्या जेएनपीटी बंदराजवळच्या द्रोणागिरी नोडमधील मर्क्स(एपीएम) गोदामे बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. एपीएम कंपनी प्रशासनाने कंपनीचे ठेकेदार असलेल्या कंपन्यांना नोटीसा पाठवल्या आहेत. यात कामगारांना देय असलेली सर्व प्रकारची रक्कम ठेकेदारांनी तयार ठेवावी असे सूचित करण्यात आले आहे. तसेच कंपनीकडून या ठेकेदारांना जे देणे असेल त्याची बिले 25 ऑगस्ट पर्यंत जमा करावयास सांगण्यात आले आहे.
एपीएम कंपनीने व्यवसाय कमी होत असल्याचे कारण देत 143 कामगारांना जानेवारी महिन्यात कामावरून कमी केले होते. या काढलेल्या 143 कामगारांनी काही दिवसांपूर्वी कंपनीच्या कामगारांची व अधिकाऱ्यांची गाडी अडवून त्यांना मारहाण केली होती. या प्रकाराची कंपनी प्रशासनाने चांगलीच धास्ती घेतली असून या भागातील सर्व प्रकारचे काम (ऑपरेशन्स) बंद करण्याचे ठरविले आहे. याचाच एक भाग म्हणून कंपनीचे ठेकेदार असलेल्या कंपन्यांना कामगारांची देणी तसेच इतर प्रकारची देण्यांची रक्कम तयार ठेवण्यास सांगितले आहे. एनपीटी परिसरात एपीएम अर्थात ए.पी. मोल्लर या डेन्मार्कच्या कंपनीची तीन गोदामे आहेत. तर पनवेलमध्ये शिरढोण गावानजीक एक गोदाम आहे. या गोदामात सुमारे 900 कामगार कंत्राटी पद्धतीवर काम करत आहेत.
summary…jnpt-mearks-godown-will-shut-down
































































