प्रत्येक अमेरिकन नागरिकाच्या बँक खात्यात 1 लाख रुपये, राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेण्याआधीच बायडेन यांची घोषणा

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी पदाची शपथ घेण्याआधीच देशातील नागरिकांसाठी आपली तिजोरी खुली केली आहे. त्यांनी कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेसाठी 1.9 ट्रिलियन डॉलर म्हणजेच 139 लाख कोटींचे मदत पॅकेज जाहीर केले आहे.

या पॅकेजमधून प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात 1400 डॉलर म्हणजेच जवळपास एक लाख रुपये थेट जमा केले जातील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा बायडेन यांनी गुरुवारी केली.

बायडेन हे येत्या 20 जानेवारीला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. त्याआधीच देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी त्यांनी भरीव मदत पॅकेज जाहीर केले. या पॅकेजला ‘अमेरिकन रेस्क्यू प्लान’ नाव देण्यात आले आहे.

देशातील सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक मदत, महामारीत कोलमडलेल्या व्यवसायांना आधार देणे आणि राष्ट्रीय लसीकरण मोहिमेला गती देणे हे या पॅकेजमागील प्रमुख हेतू आहेत. गेल्या महिन्यात लागू केलेल्या विधेयकामध्ये नागरिकांसाठी 600 डॉलरच्या मदतीची तरतूद करण्यात आली होती. नवीन पॅकेजअंतर्गत प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 1 लाख रुपये थेट जमा केले जाणार आहेत.

ऐतिहासिक गुंतवणुकीची तयारी

बायडेन यांनी पायाभूत सुविधा, बांधकाम, संशोधन, विकास आणि अपारंपरिक ऊर्जा आदी क्षेत्रांत ऐतिहासिक गुंतवणुकीची तयारी केली आहे. ते संसदेच्या संयुक्त अधिवेशनात पहिल्यांदा हजर राहतील त्यावेळी ‘बिल्ड बॅक बेटर रिकव्हरी प्लान’ सादर करणार आहेत. तसेच कामगारांना आवश्यक कौशल्य व प्रशिक्षण देण्यासाठीही गुंतवणूक केली जाणार आहे.

विविध घटकांसाठी पॅकेजची विभागणी

1.9 ट्रिलियन डॉलरच्या पॅकेजपैकी 415 अब्ज डॉलर कोरोनाशी लढण्यासाठी, 1 ट्रिलियनहून अधिक डॉलर नागरिकांसाठी तसेच 440 अब्ज डॉलर व्यवसायांसाठी दिले जाणार आहेत.

नोकरदारांना प्रती तासाच्या हिशोबाने किमान वेतन देण्यासाठी 15 डॉलर निधीचा वापर केला जाणार आहे. याआधी यासाठी 7 डॉलर निधीची तरतूद होती.

देशातील कोरोना लसीकरण मोहिमेसाठी विशेष निधी पुरवला जाईल. या मोहिमेवर 20 अब्ज डॉलर आणि कोरोनाच्या चाचणीवर 50 अब्ज डॉलर खर्च केले जातील.

आपली प्रतिक्रिया द्या