
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत विजयी झालेले जो बायडन एक कोटीपेक्षा जास्त अनिवासी लोकांना नागरिकत्व देणार आहेत. त्यासाठी 1.10 कोटी अनिवासी लोकांना नागरिकत्व देण्यासाठी आराखडा बनवण्यात येत आहे. या एक कोटी लोकांमध्ये 5 लाख हिंदुस्थानी आहेत. त्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. दरवर्षी सुमारे 95 हजार लोकांना अमेरिकेचे नागरिकत्व देण्याच्या दृष्टीने आराखडा बनवण्यात येणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात अमेरिकेत असणाऱ्या हिंदुस्थानींच्या डोक्यावर टांगती तलवार होती. नागरिकत्व देण्याबाबत आणि व्हिसाबाबतच्या नियमात बदल करण्याचा ट्रम्प यांचा विचार होता. मात्र, आता सत्ताबदल होत असल्याने सुमारे एक कोटी लोकांना अमेरिकेचे नागरिकत्व देण्याचा बायडन यांचा विचार आहे. त्याचा फायदा 5 लाख हिंदुस्थानींना होणार असून त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार आहे.
सुमारे एक कोटी लोकांना नागरिकत्व देण्यासाठीचा आराखडा तायर करण्यात येत आहे. निवडणूक प्रचारात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे नागरिकत्वासाठीची प्रक्रिया अधिक गतीमान करण्यासाठी संसदेसोबत ते काम सुरू करणार आहेत. प्रशासन गतीमान आणि कार्यक्षम करण्यासोबत अनिवासी नागरिकांना नागरिकत्व देण्याबाबत आराखडा बनवण्यात येणार आहे.
आतापर्यंतच्या धोरणानुसार नागरिकत्व देताना कुटुंबाच्या केंद्रीकरणाला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे कुटंबांच्या व्हिसांचे अनुशेष भरून निघणार आहे. तसेच त्यांची संख्या नियंत्रित होणार आहे. अमेरिकेत रोजगारासाठी येणाऱ्या अनिवासी नागरिकांचे जो बायडन स्वागत करत आहेत, असे त्यांच्या वचननाम्यात नमूद केले आहे. आगामी वर्षभरात 1.25 लाख लोकांना अमेरिकेचे नागरिकत्व देण्याचा त्यांचा विचार आहे. त्यानंतर दरवर्षी 95 हजार लोकांना नागरिकत्व देण्याबाबतचा आराखडा बनवण्यात येणार आहे.
आपली लोकशाही मजबूत असून आमच्याकडे विचारधारा आहे. तसेच मतभेदही आहेत. लोकशीहीत मतभेद महत्त्वाचे आहेत. मात्र, देशासाठी काम करण्याच्या हेतूने आपण एकत्र येऊ, असे आवाहनबायडन यांनी केले. परस्परातील वाद संपवून सामंजस्याचा मार्ग स्वीकारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सर्वांना समान अधिकार देत प्रत्येकाचे जीवनमान उंचावण्याचा हेतू असल्याचे ते म्हणाले. अमेरिकेत सत्ताबदल होत असून बायडेन यांच्या नागरिकत्वाच्या धोरणांचा 5 लाख हिंदुस्थानींना फायदा होणार आहे.
























































