जोगेश्वरी-विक्रोळी लिंक पूल आजपासून 12 दिवस बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईच्या पश्चिम व पूर्व उपनगराला जोडणारा जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड पुलावरील सांधे (एक्सपॅन्शन जॉइंट) बदलण्याचे काम करण्यात येणार असून त्यासाठी हा पूल 13 ते 24 मे असे 12 दिवस वाहतुकीला बंद राहणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पूर्व द्रुतगती मार्गावरील जेव्हीएलआर (जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्ता) पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. पुलाच्या वेगवेगळ्या भागांतील सांधे भरण्याचे काम 13 ते 24 मे दरम्यान केले जाणार असून या काळात पूल वाहतुकीसाठी पूर्णतः बंद राहणार आहे.

पुलाच्या बेअरिंगचे काम पूर्ण

पुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम तीन महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आले आहे. वाहतूक बंद न करता आतापर्यंत पुलाचे 200 बेअरिंग बदलण्यात आली आहेत. जितके बेअरिंग बदलण्यात आले आहेत, त्या भागातील एक्सपॅन्शन जॉइंट आता बदलण्यात येणार आहेत. या कामासाठी उड्डाणपूल बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र, या कालावधीत उड्डाणपुलाखालून वाहतूक सुरू राहणार आहे.