आजची हरतालिका

>>ज्योत्स्ना गाडगीळ<<

उद्या हरतालिका. गौरीने मनोवांछित वर प्राप्त होण्यासाठी अर्थात महादेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी हे कठोर व्रत केले. हिमालयाने तिच्यासाठी विष्णूला वर म्हणून सांगितले… पण तिला तिचे मनोवांछितच हवे होते. आपले विहित पार पाडीत ती महादेवाची वाट पाहात राहिली. आजच्या मुलींनाही मनोवांछित वरच हवा असतो. त्यासाठी तिची वाट पाहण्याचीही तयारी असते. किंबहुना योग्य साथीदार मिळेपर्यंत ती थांबतेच… आज तिच्या हरतालिकेची… या वाट पाहण्याच्या व्रताची परिमाणं आज वेगळी झाली आहेत. तिचं करीयर, तिच्या आवडीच्या गोष्टी, तिची स्वप्नं असोशीने जपत डोळसपणे ती तिच्या जोडीदाराची वाट पाहते आहे…

सुहास जाधव : आर्किटेक्ट

suhas-jadhav आपल्या मनासारखा नवरा हवा असेल तर आपणही आपली योग्यता सिद्ध करायला हकी. केकळ समोरच्याकडून अपेक्षा न ठेवता आपण आपली गुणकत्ता काढकली तर मनासारखा मुलगा आपणहून लग्नासाठी होकार देईल. जसा शंकराने पार्वतीला दिला. केवळ पूजेमध्ये न अडकता या व्रताकडे आधुनिक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. पूजेमुळे सकारात्मकता वाढण्यास नक्कीच मदत होईल, पण त्याचे दडपण बाळगू नये. जसे की, व्रत केले नाही तर चांगला नवरा मिळणार नाही. हे व्रत करणाऱ्या पार्वतीची समर्पणाची भाकना लक्षात घेतली पाहिजे. तिने माहेरचे सगळे वैभक सोडून शंकराबरोबर स्मशानात राहण्याची तयारी दाखवली. कालानुरूप गोष्टी बदलल्या तसा उत्सवांकडे-संस्कृतीकडे पाहण्याचा आपलाही दृष्टिकोन बदलला पाहिजे.

पल्लवी कदम : फिल्म प्रॉडक्शन असिस्टंट

pallavi-kadam मी बालपणापासून हरतालिकेची पूजा करते. बालपणी आई सांगायची म्हणून हे व्रत करत होते, आता मला त्यातून आत्मिक समाधान मिळते म्हणून मी ते करते. कोणतेही काम आपण जेव्हा स्वेच्छेने करतो, श्रद्धेने करतो तेव्हा निश्चितच फलप्राप्ती होते. अन्यथा तो केवळ सोपस्कार बनून राहतो. हरतालिकेच्या व्रतातून मला सकारात्मक ऊर्जा मिळते. मात्र, केवळ व्रत करून आपली जबाबदारी संपत नाही. एकवेळ चांगला जोडीदार मिळेलही, पण पार्वतीसारखा सुखाने संसारही करता आला पाहिजे. पार्वतीने वडिलांचा विरोध पत्करून मनाजोगता नवरा मिळवला, परंतु पत्नी, माता, मुलगी या सर्व आघाडय़ांवर ती यशस्वी ठरली. महादेवाची तिला पदोपदी साथ लाभली. आजच्या तरुणांनी हा आदर्श डोळ्यांसमोर ठेवायला हवा.

प्राजक्ता आपटे : कथ्थक नृत्यांगना

prajakta-apte चांगला नवरा मिळावा ही काही ‘एकदिवसीय’ भावना नाही. लग्न ठरेपर्यंत प्रत्येक मुलीची हीच इच्छा असते. हरतालिकेच्या व्रतामुळे ती भावना अधोरेखित होते. आजच्या करीअरिस्ट मुली लग्नाबाबतीत तडजोड करत नाहीत. उशिरा लग्न झाले तरी चालेल, परंतु मनाविरुद्ध लग्न नको अशी त्यांची पार्वतीप्रमाणे ठाम भूमिका असते. पार्वतीने तिच्या तपोबलावर शंकराला प्राप्त केले, तसे आताच्या मुली आपल्या गुणवत्तेवर मनासारखा जोडीदार मिळवतात. हे साम्य हरतालिकेच्या व्रतातून आढळून येते. त्यामुळे पुढच्या पिढीच्या ज्ञानात भर पडते. जाई, शेवंती, पारिजातक, तुळशी, रुई या पत्रींशी, एक दिवसापुरता का होईना, पण प्रत्यक्ष संबंध येतो. हे व्रत करताना ‘मला वाटते म्हणून मी करणार’ आणि ‘मी जे करतेय त्यामुळे चांगलेच घडणार’ हा विश्वास महत्त्वाचा!