
सामना प्रतिनिधी । मुंबई
ज्येष्ठ साहित्यिक केशव जगन्नाथ पुरोहित उर्फ शांताराम यांचे वृद्धपकाळाने बुधवारी वांद्रे येथील साहित्य सहवासातील निवासस्थानी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 95 होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. पुरोहित यांच्या पार्थिवावर रात्री 10 वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
के.ज.पुरोहित हे ‘शांताराम’ नावाने लेखन करीत. त्यांचा जन्म नागपूरचा. नागपूर विद्यापीठातून त्यांनी इंग्रजी विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी अमरावती, नागपूर, मुंबईमधील विविध महाविद्यालयांमध्ये 40 वर्षे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. जोगेश्वरीच्या इस्माइल युसुफ महाविद्यालयात त्यांनी प्राचार्य म्हणून काम पाहिले. पुरोहित यांचे पूर्ण नाव केशव जगन्नाथ पुरोहित पण त्यांनी `शांताराम’ या टोपणनावाने लेखन केले. 1989 साली अमरावती येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.
अंधारवाट, आठवणींचा पार, उद्विग्न सरोवर, काय गाववाले, चंद्र माझा सखा, चेटूक, छळ आणि इतर गोष्टी, जमिनीवरची माणसं, ठेवणीतल्या चीजा, धर्म, मनमोर, रेलाँ रेलाँ, लाटा, शांताराम कथा, शिरवा, संत्र्यांचा बाग, संध्याराग, सावळाच रंग तुझा, हेल्गेलंडचे चांचे (अनुवाद) आदी पुरोहित यांची साहित्य संपदा आहे. 2013 साली राज्य सरकारचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.


























































