अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी; तरुणीवर 7 महिने अत्याचार, मुरगूडमधील धक्कादायक घटना; चौघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पदवी परीक्षेचे ओळखपत्र देण्याच्या बहाण्याने बोलावून तरुणीचे अश्लील फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत सात महिन्यांपासून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुरगूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने या चौघांना ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

आदित्य बाजीराव शेटके (वय २४, रा. खिंडी व्हरवडे), रणजित संभाजी मुधोळकर (वय २९, रा. सोळांकुर), प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर (वय २४, रा. राधानगरी), विक्रम रामचंद्र पाटील (वय २२, रा. बुजवडे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

ऑक्टोबर २०२५ ते एप्रिल २०२६ यादरम्यान ही घटना घडल्याचे संबंधित तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. पीडित तरुणी बी.एस्सी. च्या दुसऱ्या वर्षात शिकते. ओळखपत्र तयार करण्यासाठी पीडितेने आपला फोटो आदित्य शेटके याच्या मोबाईलवर टाकला होता. त्यानंतर शेटके याने ‘ओळखपत्र तयार आहे. ते घेऊन जा,’ असे सांगून तिला मुदाळ तिट्टा येथे बोलावले. त्यानंतर त्याने तिला मुरगूड शहरालगत असलेल्या एका तलावाजवळील झाडीत नेले. तेथे शेटके याने पीडितेस त्याच्या मोबाईलमधील फोटोचा वापर करून अश्लील फोटो बनवण्याची धमकी दिली. त्यानंतर तिला गिरगाव (ता. करवीर) येथील लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्याचा व्हिडीओ व्हायरल करण्याची भीती दाखवून त्याचा मित्र रणजित मुधोळकर याच्याशी बोलण्यास भाग पाडले. मुधोळकरने तिला कोल्हापूर येथील लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. मुधोळकरने पीडित तरुणीस ब्लॅकमेल करून प्रणवगिरी पालकर याच्याशी स्नॅपचॅटवर बोलण्यास भाग पाडले. तसेच विक्रम पाटील याच्यासोबत पाचगाव (ता. करवीर) येथील लॉजवर शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले.

प्रत्येक वेळी या नराधमांनी पीडितेचे अश्लील फोटो व व्हिडीओ बनवून तिच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. वेळोवेळी तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. हे प्रकरण मिटविण्यासाठी पैशांची मागणी करत चारही नराधमांनी तिला धमक्या दिल्या. धमक्या आणि अत्याचार असह्य झाल्याने पीडित तरुणीने या चौघांविरुद्ध मुरगूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून या चौघांना अटक करण्यात आली. मुरगूड पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील अधिक तपास करत आहेत.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांची भेट

याप्रकरणी गुन्हा नोंद झाल्यावर तपासाचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी मुरगूड पोलीस ठाण्याला भेट देऊन माहिती घेतली आणि सखोल तपासाच्या सूचना दिल्या.

प्राध्यापिकेचा मुलगा निघाला वासनांध!

पीडित मुलीवर वारंवार जबरदस्ती करून तिचे अश्लील व्हिडीओ बनवणारा आरोपी प्रणवगिरी पालकर याची आई प्राध्यापिका आहे. त्यांच्या मुलाने केलेल्या या गंभीर गुन्ह्यामुळे संताप व्यक्त होत आहे.