
पगार न मिळाल्याने धारावी येथील बेस्टच्या काळा किल्ला आगारातील ओलेक्ट्रा बस कंपनीच्या कंत्राटी चालकांनी आज दुपारपासून संप पुकारला आहे. 100 हून अधिक चालक संपावर गेल्याने आगारातील बस रस्त्यावर आल्या नाहीत. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱया प्रवाशांचे पुन्हा हाल सुरू झाले आहेत. बँकेत पगार जमा होत नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही, अशी भूमिका चालकांनी घेतली आहे.
बेस्टमध्ये कंत्राटावर असलेल्या कर्मचाऱयांना वेळेवर पगार आणि इतर सुविधा मिळत नसल्यामुळे ते वारंवार संपाचे हत्यार उपसत आहेत. दोन दिवसांपूर्वी प्रतीक्षानगर आणि धारावी डेपोच्या चालकांनी आंदोलन केल्याने 110 बस दिवसभर रस्त्यावर आल्या नव्हत्या. आज धारावीतील काळा किल्ला डेपोतील चालकांनी संप पुकारल्याने या आगारातील बस आगारातच उभ्या होत्या. अचानक चालक संपावर गेल्याने प्रवाशांना बसच्या प्रतीक्षेत ताटकळत राहावे लागले. संपामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
प्रवाशांची तारांबळ
बेस्ट प्रशासनाने ऑलेक्ट्रा कंपनीला चालकांच्या खात्यात तातडीने पगार जमा करून कामकाज सुरू करण्यास सांगितले आहे. बेस्टनेही 30 अतिरिक्त चालकांची नियुक्ती करून बस सुरू केल्या, परंतु प्रवाशांच्या संख्येच्या दृष्टीने या बसची संख्या अपुरी असल्यामुळे रिक्षा तसेच इतर वाहने पकडून कामाचे ठिकाण गाठताना प्रवाशांची तारांबळ उडाली होती.
बँकेत पगार जमा झाल्यावर काम सुरू करणार
ओलेक्ट्रा कंपनीकडून संध्याकाळपर्यंत सर्व चालकांचे बँकेत पगार जमा होतील असे आश्वासन देण्यात आले, मात्र जोपर्यंत आमच्या खात्यात पगार जमा होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका कंत्राटी कर्मचाऱयांनी घेतली आहे.