आंबिवली इराणी वस्तीत पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन, कल्याण खडकपाडा आणि नवी मुंबई पोलिसांची संयुक्त कारवाई; दोन इराणी सराईत चेन स्नॅचर अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कल्याणजवळील आंबिवली येथील इराणी वस्तीत कल्याण खडकपाडा आणि नवी मुंबई पोलिसांच्या पथकाने मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवत दोन इराणी सराईत चेन स्नॅचरांना अटक केली. मुसा अनु सय्यद आणि काबुली नौशाद सय्यद अशी या इराणी चोरट्यांची नावे आहेत. या दोघांविरोधात नवी मुंबईसह अनेक पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईसाठी पोलिसांनी आधी अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आणि त्यानंतर थेट या इराणी वस्तीतील घरांवर धाड टाकत त्यांना ताब्यात घेतले.

नवी मुंबई येथे घडलेल्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात मुसा अनु सय्यद, काबुली नौशाद सय्यद हे दोघे पसार होते. नवी मुंबई पोलिसांचे पथक या चोरट्यांच्या मागावर होते. ते दोघे आंबिवली येथील इराणी वस्तीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आंबिवली येथील इराणी वस्ती चेन स्नॅचरचे आश्रयस्थान म्हणून कुप्रसिद्ध आहे.

आधी अ‍ॅक्शन प्लॅन बनवला मग वस्तीत घुसले

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आधी अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला. त्यानुसार काल मध्यरात्रीच्या सुमारास खडकपाडा पोलिस ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांच्या संयुक्त पथकाने मोठ्या पोलिस फौजफाट्यासह आंबिवली गाठत इराणी वस्तीत कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले. मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास सुरू झालेले हे कोम्बिंग ऑपरेशन पाच वाजता संपले. यादरम्यान पोलिसांनी मुसा अनु सय्यद, काबुली नौशाद सय्यद या दोघांच्या घरात झडप घालत या दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.