कोणताही शहा, सुलतान भाषिक हक्क हिरावू शकत नाही, हिंदीच्या मुद्यावरून कमल हासन यांनी सुनावले

517

‘विविधतेमध्ये एकता’ या तत्त्वानुसार 1950 साली हिंदुस्थानच्या गणतंत्राची स्थापना झाली. त्यानुसार सर्वच भाषांचा आदर केला गेला पाहिजे हे ठरले. अशा स्थितीत कोणताही शहा, एखादा सुलतान अथवा सम्राट देशाच्या घटनेने आम्हाला दिलेला भाषिक हक्क हिरावून घेऊ शकत नाही, अशा शब्दात ज्येष्ठ अभिनेते आणि ‘मक्कल निधी मैयम’ पक्षाचे नेते कमल हसन यांनी हिंदीच्या मुद्यावरून सुनावले.

हिंदी दिनाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘एक राष्ट्र, एक भाषा’ या धोरणाचा पुरस्कार केल्यानंतर कमल हसन यांचा संताप सोमवारी ट्विटरवर त्यांनी जारी केलेल्या एका व्हिडीओतून उघड झाला. केंद्राने हिंदी भाषेची सक्ती केलीच तर आम्ही स्वस्थ बसणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. व्हिडीओमध्ये कमल हसन खूपच आक्रमक भाषेत बोलत होते.

..तर जलिकट्टूहून मोठे आंदोलन
आमची मातृभाषा तामीळला डावलून केंद्राने जर आमच्यावर हिंदी लादण्याचा प्रयत्न केला, तर मात्र जलिकट्टूहून मोठे आंदोलन मातृभाषेच्या रक्षणासाठी आम्ही करू, असा इशाराही कमल हासन यांनी दिला. ते म्हणाले, जलिकट्टू येथे झालेले आंदोलन हे केवळ विरोध प्रदर्शन होते, पण आता हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात त्याहून मोठे आंदोलन उभारण्याची वेळ आली आहे. राष्ट्रगीत बंगाली भाषेत असते, पण त्यातील आशय पाहून देशातील कोणताही भाषिक मोठय़ा श्रद्धेने ते गीत गातो. भाषा अनेक असल्या तरी हिंदुस्थान एकसंध आहे. आमच्यावर दुसऱया भाषेची सक्ती लादू नका, असेही त्यांनी बजावले.

आपली प्रतिक्रिया द्या