सुवर्णाक्षरं हरपली… सुप्रसिद्ध सुलेखनकार कमल शेडगे यांचे निधन

353

मराठी नाटय़ आणि साहित्यसृष्टीवर ज्यांच्या अक्षरांनी अक्षरश: साम्राज्य गाजवलं, असे ‘अक्षरसम्राट’ सुलेखनकार कमल शेडगे यांचे शनिवारी वृद्धापकाळाने मुलुंड येथील घरी निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. नाटकांच्या जाहिरातींतील त्यांच्या जादुई अक्षरांनी रसिक प्रेक्षकांना नाटय़गृहांकडे खेचून घेण्याचे काम वर्षानुवर्षे केले. गेली साडेपाच दशके अक्षरांच्या दुनियेत मुशाफिरी करतानाच शेडगे अगदी शेवटच्या दिवसापर्यंत काम करत राहिले. कालच त्यांनी एका नाटकाच्या शीर्षकाचे काम पूर्ण केलं होतं. त्यांच्या निधनाने कला आणि प्रतिभेचा चमत्कार हरपला अशी भावना व्यक्त होत आहे.

कमल शेडगे यांचे शालेय शिक्षण गिरगावातील ओरिएंटल हायस्कूलमध्ये झाले. त्यांचे वडील टाइम्स ऑफ इंडियामध्ये नियतकालिकांची शीर्षके बनवण्याचे काम करायचे. शेडगे यांना मुळातच चित्रकलेची आवड होती. वडिलांनी मुलामधील चित्रकलेचे गुण ओळखून त्यांना टाइम्सच्या कलाविभागात 1956 साली नोकरी लावली. 1962 साली ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकासाठी त्यांनी पहिल्यांदा लेटरिंग केले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. पुढे अनेक मातब्बर निर्मात्यांबरोबर शेडगे यांनी नाटकांच्या जाहिरातीचं काम केलं. जाहिरातीत नाटकांच्या नावाचे लोगो वापरणे ही संकल्पना त्यांच्याचमुळे रुढ झाली. मत्स्यगंधा, कट्यार काळजात घुसली, पुरुष, नाच गं घुमा, प्रेमा तुझा रंग कसा, गारंबीचा बापू, ती फुलराणी, स्वामी, ऑल दी बेस्ट, वस्त्रहरण अशी शेकडो नाटके रसिकांपर्यंत पोहोचवण्यात शेडगे यांच्या जादुई अक्षरलेखनाचा मोठा वाटा होता.

अनेक पुस्तकांची मुखपृष्ठ त्यांनी आपल्या कलेने साकारली. त्याबरोबरच कालनिणऱय दिनदर्शिका, अक्षर, माहेर, किर्लोस्कर आणि चंदेरी यासारखी नियतकालिके आणि अनेक सिनेमांची नावे, लोगो त्यांच्या खास शैलीतून तयार झाले. आपल्या अक्षररचनेच्या वाटचालीवर त्यांनी तीन पुस्तके लिहिली. माझी अक्षरगाथा, चित्राक्षरं आणि कमलाक्षरं अशी त्यांच्या पुस्तकांची नावे आहेत. आज आपण संगणकावर जे अक्षरवळणांचे फॉण्ट्स बघतो, त्याची सुरुवात शेडगे यांनी केली. शेडगे यांच्यावर मुलुंड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आणि सून असा परिवार आहे.

मल शेडगे यांनी आमचा ’कालनिर्णय’ चा लोगो बनवला. सुरुवातीला ’कालनिर्णय’ चे तेच डिझाईन करत होते. लोगो, शीर्षक यामध्ये ते तरबेज होते. त्यातून अचूक अर्थ व्यक्त व्हायचा. मुख्य म्हणजे दिलेल्या वेळी काम पूर्ण करून द्यायचे. कामाला आणि शब्दाला पक्का, स्पष्टवक्तेपणा; पण चांगला माणूस होते. – जयराज साळगावकर, कालनिर्णय

ज्यांनी मराठी अक्षरांना सौंदर्य वळण दिले , गोडवा दिला असा एक मोठा कलाकार आपल्यातून गेला याचे दुŠख आहे. आम्हा सुलेखनकारांचे ते गुरु आहेत. उद्या गुरुपौर्णिमेला त्यांना वंदन करण्याऐवजी त्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली, याचे तीव्र दु:ख वाटतंय. – अच्युत पालव, सुलेखनकार

कमल शेडगे म्हणजे अत्यंत निर्गवी, प्रेमळ आणि कामावर श्रद्धा असणारी व्यक्ती. नाटकांच्या प्रपृतीनुसार त्याला अक्षरांचे कोदण देणारे ते एकमेव नाव घेता येईल. डिंपल पब्लिकेशनच्या 40 हून अधिक पुस्तकांची मुखपृष्ठ त्यांनी केली. ते इंग्रजी माहोलमध्ये मराठी नावाचा ठसा उमटवत होते, याबद्दल त्यांचे मी नेहमी कौतुक करायचे. – अशोक मुळे, डिंपल पब्लिकेशन

अक्षरकलेने नाटकांना दिली ब्रँड आयडेंटिटी
कमल शेडगे यांनी केलेल्या सगळ्याच नाटकांच्या जाहिराती गाजल्या. अक्षरजगतात नाट्याक्षरांचे नवीन पर्व त्यांनी सुरू केलं. आपल्या कलेने नाटय़प्रयोगाला प्रयोगमूल्य आणि संहितेचे साहित्यमूल्य यापेक्षा वेगळी अशी ब्रॅण्ड आयडेंटिटी दिली. नाटकाच्या विषयानुसार अक्षरांचा स्वभावधर्मही बदलत जातो हे आपल्या सुलेखनाने शेडगे यांनी दाखवून दिले.

आपली प्रतिक्रिया द्या