
कमला मिल अग्नितांडवप्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या मोजोस बिस्त्रोचा सहमालक युग तुली याचा जामीन अर्ज हायकोर्टाने मंजूर केला. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींना जामीन मंजूर झाल्याने समानतेच्या आधारावर न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी युगचा जामीन मंजूर केला.
डिसेंबर 2017 साली कमला मिल येथील मोजोस बिस्त्रो आणि वन अबव्ह या रेस्टॉरंटना लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. याप्रकरणी मोजोस बिस्त्रोचा सहमालक युग तुली याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने पोलिसांनी अटक केली. 27 एप्रिल 2018 साली तुलीचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला.
या निर्णयाला त्याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयानेही त्याचे अपील फेटाळत उच्च न्यायालयात तीन महिन्यांनी नव्याने जामीन अर्ज दाखल करण्याची मुभा दिली. त्यानुसार तुलीने मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता.




























































