
दोन समाजात तेढ निर्माण करणारे कोणतेही ट्वीट मी केलेले नाही, माझ्या ट्विटमुळे कोणती हिंसाही झालेली नाही असा दावा करत आपल्या व आपल्या बहिणी विरोधातील एफआयआर रद्द करण्यात यावा अशी मागणी कंगनाच्या वतीने आज मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली.
मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मीरशी करणारी अभिनेत्री कंगना हिची बहीण रंगोली हिने एका विशिष्ट समाजाबद्दल द्वेषयुक्त व अपमानकारक ट्विट केले होते तर आपल्या बहिणीला पाठिंबा दर्शवत कंगनाने एक व्हिडीओ ट्विटरवर अपलोड केला होता.
याप्रकरणी बॉलीवूडमधील कास्टिंग डायरेक्टर मुनावर अली सय्यद यांच्या तक्रारीवरून वांद्रे दंडाधिकारी कोर्टाने मुंबई पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून गुन्हा रद्द करावा यासाठी कंगना व तिची बहीण रंगोली चंदेल हिने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
या याचिकेवर आज न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. सुनावणीवेळी कंगनाच्या वतीने ज्येष्ठ वकील रिझवान सिद्दीकी यांनी युक्तिवाद केला.































































