अभिनेत्याला पोलिसांनी चौकशीसाठी घेतले ताब्यात, हत्या प्रकरणात आरोपीच्या सतत संपर्कात?

कन्नड चित्रपट अभिनेता दर्शन थुगुदीपा अडचणीत सापडला आहे. दर्शनला बंगळुरू पोलिसांनी कामाक्षिपल्य येथील एका हत्येप्रकरणी त्याच्या कथित संबंधावरून ताब्यात घेतले आहे. हत्येप्रकरणात चौकशी दरम्यान एका आरोपीने दर्शनचे नाव घेतले होते. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दर्शन हा आरोपीच्या सतत संपर्कात होता, असा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

बंगळुरू शहर पोलिसांनी मंगळवारी सकाळी कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपा आणि त्याच्या नऊ सहकाऱ्यांना एका हत्येप्रकरणी ताब्यात घेतले आहे. चित्रदुर्गातील रेणुकास्वामी नावाच्या व्यक्तीच्या हत्येप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. स्वामी हे चित्रदुर्गातील एका मेडिकल दुकानात असिस्टंट म्हणून काम करत होते. नुकतेच लग्न झाले होते. रेणुकास्वामी यांचे चित्रदुर्ग येथून अपहरण करून त्यांना शहराच्या पश्चिम भागातील कामाक्षिपल्य येथे आणले. मग त्यांची तेथे हत्या करण्यात आली, असा आरोप आहे.

रेणुकास्वामी यांच्या हत्येनंतर त्यांचा मृतदेह नाल्यात फेकण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांना त्याचा मृतदेह नाल्यातून आढळून असून त्यांच्या शारीराव जखमांच्या खुणा होत्या. त्यामुळे रेणुकास्वामी यांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. रेणुकास्वामीने दर्शनाची जवळची मैत्रिण पवित्रा गौडा यांना अश्लील फोटो पाठवले होते. त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यानंतर एका आरोपीला या हत्येप्रकरणी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने दर्शनचे नाव घेतले. त्यामुळे बंगळुरू पोलिसांनी दर्शनला अटक केली आहे.

‘कन्नड अभिनेता दर्शन आणि त्याच्या साथीदाराला आम्ही अटक केली आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. अद्याप तपास सुरू असल्याने आम्ही अधिक माहिती देऊ शकत नाही’, असे बंगळुरू पोलिसांनी सांगितले. दरम्यान, वादात सापडण्याची दर्शनची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही 2011 मध्ये त्याच्या पत्नीने त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. तर 2021 मध्ये म्हैसूरमधील एका हॉटेलमध्ये प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप दर्शनावर झाला होता. त्यामुळे दर्शनची कसून चौकशी करण्यात येत आहे.