शेतकऱ्यांना स्मार्टफोनवर 90 सेकंदांत कळणार मातीची गुणवत्ता; आयआयटी कानपूरने विकसित केले पोर्टेबल उपकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयआयटी कानपूरने शेतकऱ्यांसाठी ‘भू-परीक्षक’ नावाचे पोर्टेबल उपकरण लाँच केले आहे. या उपकरणाच्या मदतीने शेतकऱयांना स्मार्टफोनवर अवघ्या 90 सेकंदांमध्ये मातीची गुणवत्ता तपासता येणार आहे. त्यासाठी या इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपीचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.

गुगल प्ले स्टोअरवर ‘भू-परीक्षक’ हे ऍप्लिकेशन उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षणासाठी स्मार्टफोन ऍप्लिकेशनसोबत पाच ग्रॅम सुक्या मातीची आवश्यकता असते. ही माती उपकरणामध्ये टाकल्यानंतर मातीच्या गुणवत्तेचा अहवाल स्मार्टफोनवर येतो तोही अवघ्या 90 सेकंदांमध्ये. याबाबत आयआयटी कानपूरचे संचालक अभय करंदीकर म्हणाले, शेतकरी हे आपले अन्नदाते आहेत. त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मातीच्या गुणवत्ता परीक्षणासाठी त्यांना अनेक दिवस वाट पहावी लागते. या उपकरणामुळे त्यांचे काम सोपे होईल. केमिकल इंजिनीयरिंग डिपार्टमेंटचे प्रोफेसर जयंत कुमार सिंह यांच्यासह पल्लव प्रिन्स, आशर अहमद, यशस्वी खेमानी आणि मोहम्मद आमीर खान या टीमने या उपकरणासाठी मेहनत घेतली.