पंतप्रधान नरेंद्र मोदी कोसळले ‘त्या’ पायऱ्या तोडल्या जाणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कानपूर येथे झालेल्या ‘राष्ट्रीय गंगा परिषदे’ला उपस्थित राहिलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी अटल घाट वर चढून जात असताना पायऱ्यांवर अडखळले. यावेळी मोदींचा तोल जाऊन ते खाली पडण्याच्या बेतातच होते. परंतु, मोदींनी स्वत:ला कसेबसे सावरले. तोपर्यंत अंगरक्षकही त्यांच्या मदतीला धावून आले. या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता या पायऱ्या तोडण्यात येणार आहेत. त्या जागी लवकरच नव्या पायऱ्या बनवल्या जातील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नमामि गंगे मोहिमेंतर्गत सुरु असलेल्या सफाई अभियानाचा आढावा घेण्यासाठी अटल घाटावर होते. बोटीतून गंगेच्या पात्रात फिरून त्यांनी या अभियानासंबंधी चर्चा केली. त्यानंतर ते अटल घाटावर आले, तेव्हा घाटाच्या पायऱ्या चढताना पडले होते. या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह तेथे उपस्थित सुरक्षा रक्षक आणि जिल्हा प्रशासनाच्या पायाखालची जमीन सरकली होती.

दोन वर्षांपूर्वी निर्मिती
केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी 29 घाटांच्या निर्माणाचे कंत्राट इंजीनिअर्स इंडिया लिमिटेडला दिले होते. 44.30 कोटी रुपयांचे हे कंत्राट होते. एप्रिल 2018 मध्ये याच कंत्राटाद्वारे अटल घाटाची निर्मितीही केली होती. 18 महिन्यांचे काम अवघ्या 10 महिन्यात पूर्ण झाले होते.

modi-step

आम्हीही पडलोय
दिलेल्या मुदतीपेक्षा कमी वेळेत पूर्ण झालेले काम योग्य नसल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. काही ठिकाणी पायऱ्या उंच, तर काही ठिकाणी सखल ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे चालताना अंदाज येत नाही. मोदींआधीही या ठिकाणी अनेक लोक पडली आहेत, असेही स्थानिकांनी सांगितले.