होय, ही माझ्या संघाच्या भीमपराक्रमाची कहाणी! `83′ चित्रपटाचा ट्रेलर पाहून कपिलदेव झाले भावुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

25 जून 1983 या दिवशी हिंदुस्थानी क्रिकेट संघाने पहिल्यांदा विश्वचषक जिंकून देशाच्या क्रिकेट अध्यायातील सोनेरी पान लिहिले. अष्टपैलू कर्णधार कपिलदेव निखंज यांच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी संघाच्या भीमपराक्रमाची कहाणी ‘83′ या बॉलीवूडपटाच्या रूपाने रुपेरी पडद्यावर येत आहे. मंगळवारी या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. तो पाहून माजी कर्णधार कपिलदेव अतिशय भावुक झाले. त्यांनी ‘होय, ही माझ्या संघाच्या भीमपराक्रमाची कथा आहे’ असे अभिमानाने सांगत आपला आनंद व्यक्त केला. या क्रिकेटवरील चित्रपटात कपिलदेव याची भूमिका सुपरस्टार रणवीर सिंग साकारत  आहे.

कबीर खान दिग्दर्शित ‘83′  ची पटकथा हिंदुस्थानी संघाच्या  ऐतिहासिक 1983 क्रिकेट विश्वचषक विजेतेपदाभोवती  फिरते. लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाने 25 जून 1983 रोजी विश्वचषक जिंकत सोनेरी इतिहास रचला. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. तो पाहिल्यावर चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

‘क्रिकेटची पंढरी’ लॉर्ड्स मैदानावर बलढय़ वेस्ट इंडीजला पराभूत करून हिंदुस्थानी संघाने साकारलेल्या सोनेरी इतिहासाच्या स्मृती ‘83′  चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा जागवल्या जाणार आहेत. त्यामुळे क्रिकेटरसिकांत या चित्रपटाबाबत प्रचंड कुतूहल अन् उत्सुकता आहे. आता चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे. 3 मिनिटे 49 सेकंदांच्या ट्रेलरमध्ये 1983 साली झालेल्या इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानातील हिंदुस्थान विरुद्ध वेस्ट इंडीज अंतिम सामना दाखवण्यात आला आहे.

24 डिसेंबरला प्रदर्शित होणार चित्रपट ‘83′

‘83′ हा चित्रपट 24 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.  चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क, चिराग पाटील, साकीब सलीम, ताहिर भसीन, जतिन सरना, जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर, पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच अभिनेत्री दीपिका पदुकोण कपिलदेव यांच्या पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. आता चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.