
अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी आहे. 2019 साली अशाच प्रकारे कोल्हापूर, सांगली येथे नुकसान झाले होते. तेव्हा कोरडवाहु पिकांना 20 हजार 400 रुपयांची मदत देऊन तिथ पीककर्ज माफ केले होते. मग मराठवाडा व विदर्भाने कोणत पाप केले आहे असा सवाल आमदार कैलास घाडगे पाटील यानी सरकारला केला. कृषीमंत्री मराठवाड्यातील तर उपमुख्यमंत्री विदर्भाचे असूनही शेतकऱ्यांना मदतीबाबत दुजाभाव केला जात असल्याचे घाडगे पाटील यांनी म्हटले आहे.
विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाच्या प्रस्तावर आमदार पाटील यानी शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आमदार पाटील म्हणाले की, जाहीर केलेली मदत व 2019 रोजी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील मदत यामध्ये मोठा फरक आहे. मराठवाडा व विदर्भावरच असा अन्याय का?असा प्रश्न त्यानी केला. सर्व मंडळामध्ये अतिवृष्टी दिसत नसली तरी सततच्या पावसाने पिकाचे नुकसान झाले आहे. सोयाबीन पीक पूर्णतः वाया गेले आहे. त्यामुळे सरसकट सोयाबीनचे पंचनामे करण्याची मागणी आमदार पाटील यानी केली.
गोगलगाईंमुळे धाराशिव, बीड व लातूर जिल्ह्यातील नुकसान झाले आहे. किडीसाठी फक्त साडेसातशे रुपये दिले जातात. त्यापेक्षा कितीतरी पटीने नुकसान झाले आहे. यावर्षी सोयाबीनवर यलो मोझॅक नावाच्या विषाणुचा प्रादुर्भाव झाला आहे. या विषाणुमुळे पिक पिवळे पडते, त्याला शेंगा लागत नाहीत, शेंगा लागल्या तर त्यात दाणे भरत नाहीत. त्यामुळे याने देखील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बोंडअळी लागल्यावर ज्याप्रमाणे कापसाला मदत केली होती, त्याप्रमाणे या यलो मोझॅकचा समावेश करून तशी मदत दिली पाहिजे, अशी मागणी आमदार घाडगे पाटील यांनी केली आहे.





























































