बँकेचे 12 संचालक भाजपचे असल्यानेच त्यांच्यावर ईडी, सीबीआयची कारवाई नाही

1063

पंजाब ऍण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेत कोटय़वधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याने ठेवीदारांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यास बँकेचे व्यवस्थापन जबाबदार आहे. मात्र या व्यवस्थापनातील संचालकांपैकी 12 संचालक हे भाजपशी संबंधित आहेत. त्यामुळेच सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) त्यांच्यावर कारवाई करत नाही, असा अरोप आज काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी एक वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे.

पीएमसी बँकेतील गैरव्यवहारामुळे आरबीआयने निर्बंध आणल्याने ठेवीदारांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे त्यांना मोठा झटका बसला असून आतापर्यंत चार जणांचे बळी गेले आहेत. मात्र त्याकडे पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळच नाही. ते केवळ कश्मीरमधून कलम 370 कसे हटवले हे सांगण्यात मशगूल आहेत, पण त्यांनी आता पुढे येऊन तुमच्या ठेवी नक्की परत मिळतील असा विश्वास पीएमसीबीच्या ठेवीदारांना देणे आवश्यक असल्याचे कपिल सिब्बल यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच आतापर्यंत एचडीआयएल आणि भाजप संगनमातानेच काम करत आले आहे. म्हणूनच त्यांना वाधवाकडून मोठा निधी मिळत होता आसाही आरोप सिब्बल यांनी केला आहे.

मोदी म्हणतात माझ्या काळात घोटाळा झाला नाही

माझ्या कार्यकाळात देशात कोणताही घोटाळा झाला नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणात सांगत आहेत, पण पीएमसी बँकेसारखे देशात अनेक घोटाळे झाले असून त्याला भाजपच जबाबदार आहे. मात्र पंतप्रधान त्याकडे बघतच नाही, चक्क डोळेझाक करत आहेत. त्यामुळे त्यावर कारवाई होणे दुरापास्त असल्याची टीका कपिल सिब्बल यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या