
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर छोट्या पडद्यावर झळकणार असल्याची चर्चा आहे. खासगी वाहिनीवरील रिअॅलिटी शोमध्ये ती पाहायला मिळेल असेही म्हटले जात आहे. यासंदर्भात करिना कपूरकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र डान्स इंडिया डान्स या रिअॅलिटी शोमध्ये ती दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आई झाल्यानंतर करिना कपूर मोठ्या पडद्यावर झळकलेली नाही. मात्र आता टीव्ही वाहिनीवरील डान्स इंडिया डान्स मध्ये येण्यास ती उत्सुक असल्याचे कळते. सगळं अगदी व्यवस्थित झाल्यास कोरिओग्राफर बोस्को मार्टीस यांच्या पॅनेलमध्ये ती पाहायला मिळेल. आम्ही करिनासोबत या शो संदर्भात बोललो आहोत आणि या कार्यक्रमासोबत जोडले जाण्यासाठी ती उत्सुक आहे. लवकरच करार होईल अशी आमची आशा आहे, अशी माहिती शोच्या आयोजक सूत्रांनी इंग्रजी वृत्तपत्राकडे दिली आहे. करिना सध्या गुड न्यूज, हिंदी मीडियम-2, तख्त या तीन चित्रपटांवर काम करत आहोत.




























































