
भरधाव ट्रकने मालवाहू रिक्षा, दुचाकी आणि जीप या तीन वाहनांना दिलेल्या धडकेत दोनजणांचा जागीच मृत्यू झाला असून, दहाजण जखमी झाले आहेत. नगर-सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील बोरूडे वस्ती येथे गुरुवारी रात्री ही घटना घडली.
कृष्णा मल्हारी बोरुडे (वय 25, रा. कोकणगाव, ता. कर्जत), सोपान दिनकर काळे हे जखमी झाले आहेत. नगरहून सोलापूरकडे जाणाऱया भरधाव मालट्रकने कर्जत तालुक्यातील कोकणगावजवळ असणाऱया बोरुडे वस्ती परिसरात नगरहून सोलापूरकडे जात असलेल्या मालवाहू रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात मालवाहू रिक्षा रस्त्याच्या कडेला खाली जाऊन उलटली.
यानंतर रिक्षाच्या पुढे जाणाऱया दुचाकीलाही ट्रकने धडक दिली. काही अंतर त्या दुचाकीला फरफटत नेले. यात दुचाकीस्वार कृष्णा बोरुडे याचा ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला. दरम्यान, त्याचवेळी सोलापूरहून नगरकडे जाणारी क्रूझर जीप समोरून येत होती. समोरून येणाऱया ट्रकसोबत धडक टाळण्याचा प्रयत्न करणाऱया क्रूझरलाही ट्रकने धडक दिली. यामध्ये क्रूझरमधील सोपान काळे याचाही मृत्यू झाला.
दरम्यान, अपघाताची माहिती समजताच, परिसरातील नागरिक व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी धावले. या ट्रकने दिलेल्या धडकेत दहाजण गंभीर जखमी झाले होते. त्या सर्वांना तत्काळ रुग्णवाहिकेमधून नगर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. या अपघातातील मुख्य आरोपी ट्रकचालक गाडीसह फरार झाला. पोलिसांनी काही अंतरावर ट्रक पकडला. मात्र, त्यात चालक मिळून आला नाही. याप्रकरणी कर्जत तालुका पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
























































