
कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फेर मतमोजणीची दोन उमेदवारांनी मागणी केली आहे. त्यामुळे सभापती निवड प्रक्रिया लांबणीवर पडणार काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
कर्जत बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये फेर मतमोजणीची मागणी लीलावती बळवंत जामदार व भरत संभाजी पावणे या दोन पराभूत उमेदवारांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गणेश पुरी यांच्याकडे लेखी अर्ज करून केली आहे. याबाबत उद्या मंगळवारी सुनावणी होणार आहे. यामुळे या सुनावणीमध्ये काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे कर्जत बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीची निवड प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कर्जत बाजार समितीची निवडणूक आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांच्यामुळे गाजली. उमेदवार फोडाफोडीपासून ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. या निवडणुकीमध्ये 18 जागांपैकी दोघांनाही या निवडणुकीत प्रत्येकी नऊ अशा समान जागा मिळाल्या. यामुळे आता कोण सभापती होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.
उद्या होणार सुनावणी
दरम्यान, कोण सभापती होणार? याविषयी चर्चा सुरू असतानाच भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या पॅनलमधून पराभूत झालेले लीलावती जामदार व भारत पावणे या दोन उमेदवारांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थांचे गणेश पुरी यांच्याकडे लेखी अर्ज करून ग्रामपंचायत महिला व एक सर्वसाधारण जागा यांची संपूर्ण फेर मतमोजणी केली जावी, अशी मागणी केली आहे. या अर्जाची दखल घेत जिल्हा उपनिबंधक यांनी उद्या मंगळवारी सुनावणी ठेवली आहे. फेर मतमोजणीचे आदेश दिले, तर निकाल बदलणार का पराभूत उमेदवार विजयी होणार का आणि समान जागा मिळाल्याचे समीकरण बदलणार का याविषयी चर्चा सुरू आहे.
मतमोजणीच्या वेळी आपण फेर मतमोजणीची मागणी मान्य केली होती व निकाल पत्रकानुसार उमेदवारांची पडलेली मते आपण त्यांना दाखविण्यास तयार होतो. सर्व गट हे त्यांच्यासमोर मांडण्यात आले होते. मात्र, त्यांनी संपूर्ण फेर मतमोजणीची मागणी केली होती. केलेली मतमोजणी अचूक आहे.
– सुखदेव सूर्यवंशी, सहायक निबंध, कर्जत

























































