
मराठी भाषिकां विषयी कन्नडिगांचा द्वेश आज पुन्हा एकदा कर्नाटकातील मराठी भाषिक सीमाभागात दिसून आला. मराठा विकास प्राधिकरण स्थापनेसंदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुराप्पा यांचे अभिनंदन करण्यासाठी बेळगाव येथे लावण्यात आलेल्या मराठी भाषेतील फलकालाच कन्नडीगांनी काळे फासले. त्यानंतर हे समाज कंटक मराठी विरोधात घोषणा देत तेथून पसार झाले. दरम्यान दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण करणा-या या कन्नड समाजकंटकांवर उशिरापर्यंत पोलिसांनी कारवाई केली नव्हती.
मराठा समाजाच्या व्होटबॅंकेसाठी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मराठा विकास प्राधिकरणाची घोषणा केली. दि.१३ नोव्हेंबर याची स्थापना करुन,दुसऱ्या दिवशी त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. कन्नड संघटनांनी या प्राधिकरणाला विरोध करून, कर्नाटक बंदची हाक दिली. मराठी भाषिक सीमालढा आंदोलनाच्या चळवळीचे प्रमुख केंद्र असलेल्या,बेळगावात या प्राधिकरण स्थापनेला थेट विरोध नसला तरी काही कन्नड संघटनांचे पोटशूळ उठले होते.
कन्नड संघटनांच्या दबावामुळे प्राधिकरणाऐवजी मराठा समाज महामंडळ स्थापन करण्याची घोषणा कर्नाटक सरकारने केली. तरीही कन्नड संघटनांनी विरोध कायम ठेवला. त्याचेच प्रत्यंतर आज दिसून आले.
या प्राधिकरण स्थापनेसाठी पाठपुरावा केल्याचे श्रेय बेळगावचे दोन्ही आमदार घेत आहेत. बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या पुढाकाराने मराठा समाजाशी संबंधित काही संघटनांनी विजयोत्सव साजरा केला.तर शहरात विविध ठिकाणी अभिनंदनाचे फलकही लावण्यात आले.दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या समर्थकांनी अनगोळ नाका येथे फलक लावला होता.याच फलकाला आज शुक्रवारी सायंकाळी काळे फासण्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे परीसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गळ्यात लाल व पिवळ्या रंगाचा स्कार्फ घातलेल्या दोन तरूणांनी हे कृत्य केल्याचे पाहणारे सांगत असुन, मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी याचे व्हिडिओ सोशल मिडियातुन जाणीवपूर्वक पसरविले जात होते.त्यामुळे सीमाभागात पुन्हा भाषिक तणाव निर्माण झाल्याने,हा फलक तातडीने हटविण्यात आला. पण समाजकंटकांवर रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी कसलीही कारवाई केली नव्हती.




























































