
कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा लवकरच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. वय आणि तब्बेत बरी नसल्याच्या कारणांमुळे ते पदाचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात आहे.
सत्तेवर आल्याला दोन वर्षे पूर्ण होत असतानाच बी. एस. येडीयुरप्पा यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची त्यांनी भेट घेऊन चर्चा केली. वाढते वय आणि त्यामुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या समस्या यामुळे अधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणं शक्य नसल्याचं येडीयुरप्पा यांनी पक्षनेतृत्वाला सांगितल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
कर्नाटक भाजपात येडीयुरप्पा यांच्या नेतृत्वाबाबत असंतोष असून अनेक नेते सध्या उघडपणे त्यांच्याविरोधात बोलत आहेत. काहींनी तर थेट केंद्रीय नेतृत्वाकडे याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे कर्नाटक प्रभारी अरुण सिंह यांनी नुकताच राज्याचा दौरा करून आमदारांची आणि इतर प्रमुख नेत्यांची मतं जाणून घेतली होती.
दरम्यान, येडीयुरप्पा यांनी राजीनाम्याच्या चर्चेत काही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. शुक्रवारी मी पंतप्रधानांना भेटून राज्याच्या विकासाबद्दल सविस्तरपणे चर्चा केली. पुढच्या महिन्यात मी पुन्हा दिल्लीला जाणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पुन्हा सत्ता आणण्यासाठी काम करणार
देशात व राज्यात पक्षाचा विकास कसा करायचा आणि कर्नाटकातील पक्षाच्या महत्त्वाच्या मुद्यांविषयी नड्डा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. माझ्याबद्दल त्यांचे चांगले मत असून मी राज्यात पुन्हा सत्ता आणण्यासाठी काम करणार आहे. गृहमंत्री शहा यांनी कर्नाटकात पुन्हा सत्ता आणण्यासाठी कठोर मेहनत करा, लोकसभेतही कर्नाटकातून जागा वाढतील याकडे लक्ष द्या, अशा सूचना दिल्याचे येडीयुरप्पा म्हणाले.



























































