रस्त्यावरून जाताना चायनीज नायलॉन मांजामुळे गळा कापला, मोटारसायकलस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

जीवघेण्या नायलॉनच्या मांजामुळे एका मोटारसायकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेत एका ४८ वर्षीय व्यक्तीने जीव गमावला आहे. कर्नाटकच्या बिदर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पतंगाच्या चायनीज नायलॉन मांजावर बंदी असतानाही त्याचा वापर होत असल्याचे या घटनेवरून समोर आले आहे.

संजू कुमार होसमानी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो बिदर जिल्ह्यातील तलामडगी पुलाजवळ दुचाकीवरून जात होता. यावेळी पतंगाचा मांजा त्यांच्या गळ्याला अडकला. मांजा इतका तीक्ष्ण होता की त्यामुळे त्यांच्या गळ्याला खोलवर जखम होऊन रक्तस्त्राव सुरू झाला आणि ते खाली पडले. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तीने होसमानीच्या जखमेवर कापड बांधून रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रुग्णवाहिका बोलावण्यात आली होती. परंतु ती येण्यापूर्वीच होसमानीचा यांचा मृत्यू झाला. रुग्णवाहिका वेळेवर आली असती तर, त्यांचा जीव वाचू शकला असता, असा आरोप कुटुंबातील सदस्यांनी केला आहे.

या घटनेनंतर, होसमानीचे कुटुंब आणि स्थानिक रहिवासी तसेच घटनास्थळी जमलेल्यांनी नायलॉन मांजा विरोधात कठोर कारवाई करण्याची आणि आपत्कालीन सेवा सुधारण्याची मागणी करत निषेध केला आहे. या प्रकरणाबाबत मन्ना एकाहेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.