कर्नाटकातील कुमारस्वामी सरकार कोसळले

102

सामना ऑनलाईन । बंगळुरू

कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या राजकीय नाट्याला आता वेगळे वळण मिळाले आहे. विधानसभेमध्ये घेण्यात आलेल्या विश्वासदर्शक ठरावात सरकार पराभूत झाले आहे. त्यामुळे कर्नाटकातील जेडीएस- काँग्रेस आघाडीचे कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळले आहे. कुमारस्वामी यांच्या विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 99 तर विरोधात 105 मते पडली.

कर्नाटक विधानसभेत मंगळवारी सरकारने मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्यात आले. यावेळी बहुमत सिद्ध करण्यात कुमारस्वामी सरकार अपयशी ठरले. कुमारस्वामी सरकार कोसळल्याने भाजपचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाल्याचे मानण्यात येत आहे. गेल्या 14 महिन्यांपासून काँग्रेस जेडीएस आघाडीचे सरकार कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली सुरू होते. सुरुवातीपासूनच परस्परातील आरोप प्रत्यारोपामुळे सरकार अडचणीत येत होते. गेल्या 15 दिवसांपासून कर्नाटकात राजकीय घडामोडी घडत होत्या. आघाडीतील 15 बंडखोर आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर सरकार अडचणीत आले होते. हा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यतही पोहचला होता. न्यायालयाने बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिले होते. विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या 12 बंडखोर आमदारांना मंगळवारी सकाळी 11 वाजता सभागृहात उपस्थित राहण्यासाठी समन्स पाठवले होते. मात्र, बंगळुरूत परतण्यासाठी असमर्थता व्यक्त करत त्यांनी भेटीसाठी 4 आठवड्यांचा वेळ मागितला.

कुमारस्वामी सरकार कोसळल्यानंतर भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विधानसभेबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. माजी मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा यांनी विजयाचे चिन्ह दाखवत पुढील संकेत दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या