
अॅपल कंपनीचे फोन बनवणाऱ्या फॉक्सकॉन या तैवानच्या कंपनीने केलेल्या लॉबिंगनंतर कर्नाटक येथील सत्ताधारी भाजप सरकारने श्रम कायद्यात बदल केल्याचं उघड झालं आहे. द फायनान्शियल टाइम्सने दिलेल्या अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे.
कर्नाटक विधानसभेत 1 मार्च रोजी श्रम कायदा पारित करण्यात आला. ज्यात 12 तासांच्या शिफ्टचा तसेच महिलांना रात्रपाळीसाठी काम करण्याच्या परवानगीचा उल्लेख करण्यात आला होता. तसंच, या कायद्यान्वये दिवसाला 12 तास काम या हिशोबाने आठवड्याचे सलग चार दिवस काम करावं लागणार आहे. त्यानतंर तीन दिवसांची सुट्टी देण्यात येईल. ओव्हर टाईमची वेळ तीन महिन्यांच्या कालावधीसाठी 75हून 145 इतकी करण्यात आली आहे. मात्र, कामाचे तास जास्तीत जास्त 48 तास प्रति आठवडा इतके निश्चित करण्यात आले आहेत. या खेरीज महिलांना संध्याकाळी 7 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कामाला परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी योग्य त्या सुरक्षा योजना आणि वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पण, एकिकडे हा कायदा पारित होत असताना आधीच्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना मेहनताना न दिल्याने वारंवार बंद पुकारण्याची वेळ येत असल्याचं दिसून आलं आहे. फॉक्सकॉन आणि अॅपलसहित हिंदुस्थानी उद्योग समूहातील लॉबिंगनंतर श्रम कायद्यात बदल करण्यात आले आहेत. पण, हे बदल करताना श्रमिक संघटना किंवा कामगार संघटनांसोबत कोणतीही बैठक झाली होती किंवा नाही, याबाबत कसलीही माहिती देण्यात आलेली नाही, असा खुलासा या अहवालातून झाला आहे.




























































