
कर्नाटक सरकारच्या कुरघोडय़ा पुन्हा सुरू झाल्या आहेत. सोलापूरकरांचे पिण्याचे पाणी कर्नाटक पळवत आहे. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या परवानगीशिवाय सीमाभागातील पाणीसाठय़ात 570 एचपी क्षमतेचे तीन नवीन पंप टाकून पाणी उपसा कर्नाटककडून केला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी केला आहे. सरकारने यात गांभीर्याने लक्ष घातले पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.
माहितीचा मुद्दा तसेच लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून जयंत पाटील यांनी याप्रश्नी सरकारवर आज विधानसभेत हल्लाबोल केला. सीमावर्ती भागातील टेंभू योजनेसाठी गेली 27 वर्षे लोकांचा लढा सुरू आहे. सर्वात जास्त अडचणी या योजनेला आल्या आहेत. तासगाव, खटाव, माण, पंढरपूर, खानापूर, आटपाडी येथील काही गावांमध्ये या योजनेचे काम बाकी आहे. या कामांना आणखी 24-25 वर्षे लागता कामा नयेत म्हणून या योजनेला प्रधानमंत्री सिंचन योजनेत सहभागी करून दोन वर्षाचा टाईम बाऊंड कार्यक्रम आखून ही योजना पूर्ण करावी अशी मागणी जयंत पाटील यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून सभागृहात केली.
मागच्या काळात आपण जलसंपदा मंत्री असताना या भागाला अतिरिक्त 8 टीएमसी पाणी देऊ केले होते. त्याची डिझाइन पूर्ण आहे. त्यावर लवकरात लवकर अंमलबजावणी करावी. बजेटमध्ये विशेष बाब म्हणून तरतूद करावी अशी सूचनाही पाटील यांनी केली.






























































