कर्नाटक सरकारकडून कोगनोळी टोलनाक्यावर कोरोना नाकाबंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याच्या शक्यतेने कर्नाटक सरकारने ‘अलर्ट’ जारी केला आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करण्यात येणाऱया सीमाभागातील पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी टोलनाक्यावर शनिवारपासून पुन्हा एकदा ‘कोरोना नाकाबंदी’ करण्यात आली आहे. दरम्यान, टोलनाका परिसरात तहसीलदार कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने कर्मचारी, तसेच ‘आशा’ कर्मचारी, वैद्यकीय अधिकाऱयांची नियुक्तीही करण्यात आली आहे.

केंद्र सरकारचा कोणताही आदेश नसताना, महाराष्ट्रातून कर्नाटक राज्यात जाणाऱया प्रत्येक गाडीतील प्रवाशांची शनिवारपासून तपासणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कर्नाटक प्रशासनाकडून पुन्हा एकदा ‘कोरोना चेक पोस्ट’ सुरू करण्यात आला असून, मोठय़ा प्रमाणात कर्मचारी तैनात केले आहेत. अन्य राज्यांत कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, कर्नाटकने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. कर्नाटकात बाहेरून प्रवेश करणाऱया नागरिकांचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्याकडे ‘कोविड निगेटिव्ह’चे प्रमाणपत्र असल्याशिवाय कर्नाटकमध्ये प्रवेश न देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रकच कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी काढले आहे.

‘पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी टोलनाक्यावर कर्नाटक सरकारच्या वतीने आरोग्य तपासणी यंत्रणा उभारण्यात आली असून, सर्व चारचाकी खासगी व अन्य वाहनांमधून येणाऱया प्रवाशांची तपासणी करूनच त्यांना कर्नाटकमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. ताप, खोकला, सर्दी अशी लक्षणे आढळल्यास त्यांना परत पाठविण्यात येणार आहे.’

– प्रकाश गायकवाड, तहसीलदार, निपाणी.