
कर्नाटक उच्च न्यायालयाने गुरुवारी सोशल मीडिया अग्रेसर कंपनी फेसबुकला इशारा दिला की ते हिंदुस्थानातील त्यांचे ऑपरेशन बंद करण्याचा आदेश जारी करतील. सौदी अरेबियामध्ये तुरुंगात असलेल्या हिंदुस्थानी नागरिकाच्या संदर्भात एका प्रकरणाचा तपास करताना फेसबुकने कर्नाटक पोलिसांशी असहकार केल्यामुळे उच्च न्यायालयानं हा इशारा दिला आहे.
तुरुंगात असलेल्या हिंदुस्थानी नागरिकाची पत्नी कविता हिने केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती कृष्णा एस दीक्षित यांच्या खंडपीठाने फेसबुकला इशारा दिला. या प्रकरणी पुढील कारवाईची माहिती देण्याचे निर्देशही न्यायालयाने केंद्राला दिले आहेत.
न्यायालयाने मंगळुरू पोलिसांना योग्य तपास करण्यासाठी संपूर्ण अहवाल सादर करण्यास सांगितले आणि सुनावणी 22 जूनपर्यंत पुढे ढकलली.
हे सर्व सुरू झाले जेव्हा कविताने तिच्या याचिकेत सांगितले की, तिचा नवराशैलेश कुमार हा सौदी अरेबियामध्ये 25 वर्षांपासून एका कंपनीत काम करत होता. तिने याचिकेत नमूद केले आहे की त्याने 2019 मध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) च्या समर्थनार्थ फेसबुकवर एक संदेश टाकला होता.
काही बदमाशांनी त्याच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडून सौदी अरेबियाचा राजा आणि इस्लाम यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या. ही बाब शैलेश यांना समजताच त्यांनी कुटुंबीयांना माहिती दिली. मंगळुरूजवळील बिकर्नाकट्टे येथील मूळ रहिवासी असलेल्या त्यांची पत्नी कविता यांनी मंगळुरू पोलिसांत तक्रार दाखल केली. दरम्यान, सौदी पोलिसांनी शैलेशला अटक करून त्याच्या नावाने फेसबुकवर अपमानास्पद पोस्ट टाकल्याप्रकरणी त्याला तुरुंगात टाकले होते.

























































