
कर्नाटकचे ग्रामविकास मंत्री प्रियांक खरगे यांच्या अमेरिका दौऱ्याला केंद्र सरकारने लाल दिवा दाखवला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्या अमेरिका दौऱ्याला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे मोठा वाद उफाळून आला आहे. आधी तपास यंत्रणांच्या माध्यमातून मुस्कटदाबी करणारे केंद्र सरकार आता विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या विदेश दौऱ्यातही आडकाठी आणत आहे. यावर प्रियांक खरगे यांनीही संताप व्यक्त केला असून याबाबत केंद्र सरकारकडे स्पष्टीकरण मागणार असल्याचे त्यांनी म्हटले.
प्रियांक खरगे हे दोन कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी अमेरिका दौऱ्यावर जाणार होते. मात्र परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने त्यांना अमेरिकेत जाण्याची परवानगी नाकारली आहे. त्यांना परवानगी का नाकारण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. केंद्राच्या या निर्णयामुळे काँग्रेस आणि भाजपमधील राजकीय वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे सुपुत्र असलेले प्रियांक खरहे सध्या पॅरीसमध्ये आहेत. तिथे आयोजित एका परिषदेला आणि एअर शोला ते उपस्थित राहिले. त्यानंतर ते अमेरिका दौऱ्यावर रवाना होणार होते. परंतु त्यांना परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे ते हिंदुस्थानात परततील अशी आशा आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने अमेरिका दौऱ्याची परवानगी नाकारल्यानंतर प्रियांक खरगे यांनी एक्सवर (आधीचे ट्विटर) एक पोस्ट लिहिली आहे. ‘सध्या मी कोणतेही सार्वजनिक विधान करणे टाळत आहे. मी बंगळुरुला परतल्यानंतर परवानगी का नाकारण्यात आली याबाबत केंद्र सरकारकडे स्पष्टीकरण मागणार आहे’, असे प्रियांक खरगे यांनी म्हटले.
पॅरीसमधील एअर शोमध्ये सहभाग
प्रियांक खरगे यांनी पॅरीस एअर फोरम आणि पॅरीस एअर शोमध्ये सहभागी झाले. प्रियांक यांच्याकडे अमेरिकेचा वैध व्हीसा आहे. मात्र तरीही त्यांना अमेरिका दौऱ्याची परवानगी नाकारण्यात आली. यावरून आता भाजप-काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.