कर्नाटकात पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत चूक;‘एसपीजी’चे कडे तोडून तरुण कारजवळ पोहोचला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्नाटक दौऱयात सुरक्षेमध्ये मोठी चूक झाली आहे. पंतप्रधानांचा रोड शो सुरू असताना स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची सुरक्षा भेदून एक तरुण हार घेऊन त्यांच्याजवळ पोहोचला. यानंतर सुरक्षा कर्मचाऱयांनी तत्काळ या तरुणाला पंतप्रधानांपासून दूर केले.

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त कर्नाटकात हुबळी येथे राष्ट्रीय युवक महोत्सवाचे आयोजन केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी यांनी हुबळी शहरातून रोड शो केला. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रोड शो वेळी लोकांची रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी होती. पंतप्रधान कारच्या दरवाज्यात उभे राहून लोकांना अभिवादन करत होते. एसपीजी कमांडो आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. मात्र या गर्दीत एक तरुण रस्त्याच्या कडेला हार घेऊन उभा होता. पंतप्रधानांचा ताफा जात असताना तरुण कडेकोट सुरक्षा भेदून पंतप्रधानांच्या कारच्या दिशेने पुढे आला. तो कारजवळ पोहोचला आणि पंतप्रधानांना हार घालण्याचा प्रयत्न करत होता. मात्र सुरक्षारक्षकांनी तत्काळ तरुणाला बाजूला केले. मात्र तरुणाने दिलेला हार घेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी हात पुढे केल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

सुरक्षेत त्रुटी नाही; पण तरुण अचानक घुसला – पोलीस आयुक्त

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र हुबळी-धारवाडचे पोलीस आयुक्त रामन गुप्ता यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी असल्याचा इन्कार केला. रस्त्याच्या कडेला उभे राहिलेल्या प्रत्येक नागरिकाची पोलिसांनी कसून तपासणी केली. तसेच हारही तपासून पाहिले. तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त होता. मात्र तरुणाने अचानक बॅरिकेटवरून उडी मारली आणि तो घुसला, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.