
आपल्याला मुलगा व्हावा म्हणून अनेक आई-वडील नवस करतात. आपला मुलगा म्हातारपणात आपला आधार बनेल या आशेने ते मोठ्या प्रेमाने मुलाचे पालनपोषण करतात. आई-वडिलांना जितकं शक्य होईल तितकं ते आपल्या मुलाचे चांगले संगोपन करतात. मात्र कलयुगात जन्माला आलेल्या आजच्या मुलांना या गोष्टीची जाणीव नाही आहे.
टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, कर्नाटकमधील बेगळगाव शहरात एका निर्दयी मुलाने आपल्याच जन्मदात्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 25 वर्षांच्या मुलाने वडील मोबाईलवर ‘पब्जी’ खेळून देत नाही, म्हणून त्यांची हत्या केली. आरोपी रघुवीर कुंभार याला पब्जी खेळण्याची सवय होती. तो आपला जास्तीस्त जास्त वेळ पब्जी खेळण्यातच घालवायचा. ही गोष्ट त्याचे वडील शंकरप्पा यांना आवडत नव्हती. या गोष्टीवरून शंकरप्पा यांनी अनेकवेळा रघुवीर याला रोखले होते. मात्र आरोपी वडिलांचे म्हणणे मानण्याऐवजी तो नेहमीच त्यांच्यावर चिडायचा.
मोबाईलवर गेम्स खेळण्यावरून अनेकदा वडील आणि मुलामध्ये भांडण झाले होते. रविवारीही दोघांमध्ये पुन्हा यावरून वाद झाला. त्यावेळी संतापाच्या भरात रघुवीरने त्याच्या आईला आधी एका खोलीत कोंडले आणि वडिलांची अत्यंत निर्घृणतेने हत्या केली. हत्या केल्यानंतर त्याने वडिलांच्या हातापायाचे तुकडे केले. पोलिसांनी रघुवीरला अटक केली असून त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे.




























































