
कार्तिकी यात्रा व्हावी अशी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची इच्छा आहे. त्याचबरोबर वारी नियमित व्हावी, अशीही इच्छा आहे. मात्र, कोरोनाबाबतच्या शासन निर्णयाच्या अधीन राहून वारी भरवावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी कार्तिकी यात्रेच्या धर्तीवर 65 एकर, चंद्रभागा वाळवंट, वाखणी पालखीतळ अशा विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली होती. पाहणीनंतर यात्रेबाबत मंदिर समितीने प्रस्ताव सादर केल्यास शासनाला प्रस्ताव पाठवून निर्णय शासन निर्देशानुसारच घेण्यात येईल, असे सांगितले होते.
कार्तिकी वारीतील एकादशीचा मुख्य सोहळा 15 नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. श्री विठ्ठल मंदिर दर्शनाकरिता खुले झालेले आहे. त्यामुळे कार्तिकी यात्रा भरवावी की नाही, याबाबत रविवारी मंदिर समितीची सहअध्यक्ष औसेकर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे, शकुंतला नडगिरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते. या बैठकीत कार्तिकी यात्रा भरवण्यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती सज्ज असल्याची माहिती दिली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीनंतर मंदिर समितीकडून प्रस्ताव पाठविण्यात आल्याचेही औसेकर यांनी सांगितले.
औसेकर महाराज म्हणाले, 17 एप्रिल 2020 पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा बंद झाल्या. मात्र, सध्या कोरोनाचे सावट कमी झाले आहे. शासन निर्णयानुसार येणाऱया प्रत्येक भाविकाला मास्क, सोशल डिस्टन्स व सॅनिटायझरचा वापरणे करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. भाविकांची गैरसोय होणार नाही, भाविकांची काळजी घेण्यास मंदिर समिती तयार आहे. त्यामुळे मंदिर समिती यात्रेसाठी सज्ज असल्याचेही औसेकर यांनी सांगितले.
प्रक्षाळपूजेपर्यंत ऑनलाइन दर्शन बंद राहणार
कार्तिकी यात्रेला येणाऱ्या जास्तीत जास्त भाविकांना श्री विठ्ठलाचे दर्शन मिळावे यासाठी दशमी, एकादशी व द्वादशी दिवशी ऑनलाइन दर्शन बंद राहणार आहे. त्याचबरोबर पलंग काढल्यापासून ते प्रक्षाळपूजेपर्यंत ऑनलाइन दर्शन बंदच असणार असल्याचे औसेकर यांनी सांगितले.





























































