
राज्यामध्ये अनेक प्रश्न आता निर्माण झालेले आहेत. अनेक विषय प्रलंबित आहेत. या विविध प्रश्नांच्या संदर्भात पुढच्या आठवडय़ात राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती शिवशक्ती सेना पक्षाच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दरम्यान, मंत्र्यांच्या दालनावर सुरू असलेला 3600 कोटी व आमदार निवास बांधण्यासाठी 900 कोटींचा खर्च त्वरित थांबवा, अशी मागणीही त्यांनी केली.
करूणा मुंडे म्हणाल्या, राज्यभर पक्षाच्या वतीने आम्ही दौरा सुरू केला आहे. मी नुकतीच संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱयावर गेले असता, त्या ठिकाणी माझे पती मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी येऊन माझी सभा रोखण्याचा प्रयत्न केला. माझ्या पक्षामध्ये अनेक संघटना तसेच इतर पक्षांचे लोकसुद्धा येणार आहेत. यासह राज्यातील दोन मंत्र्यांच्या पत्नीही माझ्या पक्षात येणार असल्याचेही करुणा मुंडे म्हणाल्या.
‘तिच्या’कडे 3 कोटींच्या साडय़ा
मी राजकारणात येऊ नये म्हणून पती धनंजय मुंडे माझ्यावर दबाव टाकत आहेत. पण, एकदा राजकारणात आल्यावर यू टर्न नसतो. नाहीतर विश्वासार्हता संपते. मी एकदम साधी राहणारी आहे. मंत्र्यांच्या बायका गाडीतून फिरतात व 25 हजारांच्या साडय़ा परिधान करतात, पण माझ्याकडे कपाटात 5 लाखांच्या ही साडय़ा नाहीत; पण धनंजय मुंडेंच्या दुसऱया पत्नीच्या कपाटात 3 कोटींच्या साडय़ा आहेत, असे करुणा मुंडे म्हणाल्या.





























































