
राज्यात पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्या, पण त्यात भाजपला अपेक्षित असलेले यश मिळाले नाही. या निवडणुकांनंतर पुण्यातील कसबा आणि पिंपरी या दोन्ही ठिकाणी विधानसभेच्या पोटनिवडणुका होणार आहेत. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने ताकद लावली असून आज कसबा पोटनिवडणुकीसाठी रविंद्र धंगेकर यांनी अर्ज भरला. यावेळी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते.
कसबा व चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा भाजपाने व्यक्त केली आहे. यावर बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, कोल्हापूर, देगलुर, पंढरपूरच्या पोटनिवडणुकीवेळी भाजपाने अशी भूमिका घेतली नाही, भाजपाच्या सोईने निर्मण होणार नाही. विधानसभेची ही पोटनिवडणुक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना एकत्र मिळून लढवत आहेत. या दोन्ही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित विजयी होतील असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.
भाजपची मागणी सोयीनुसार
कसबा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष त्यांच्या सोयीनुसार बिनविरोधची मागणी करत आहे. पण आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे की, महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल असे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी रविंद्र धंगेकर हे प्रचंड मताने निवडून येतील असे म्हटले.
टिळक कुटुंबाला डावलल्याने पुणेकरांमध्ये नाराजी, कसब्यात लागले भाजपविरोधी बॅनर
काँग्रेसमध्ये मतभेद नाहीत
काँग्रेसमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. भाजपकडून मुद्दामहून वावड्या उठवल्या जात आहेत. थोरात यांनी कोणाचेही नाव घेतलेलं नाही. मी, नाना पटोले, सुशीलकुमार शिंदे आम्ही सर्व जण अर्ज भरण्यासाठी आलो आहोत, असे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.
‘भाजप लोकमान्य टिळक व टिळक कुटुंबाला विसरली, गरज संपली की…’, नाना पटोलांचा निशाणा

































































