टिळक कुटुंबाला डावलल्याने पुणेकरांमध्ये नाराजी, कसब्यात लागले भाजपविरोधी बॅनर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्या, पण त्यात भाजपला अपेक्षित असलेलं यश मिळालं नाही. या निवडणुकांनंतर पुण्यातील कसबा आणि पिंपरी या दोन्ही ठिकाणी विधानसभेच्या पोटनिवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पण, त्यात टिळक कुटुंबाला डावलल्यामुळे पुणेकरांत नाराजीचा सूर आहे. कसब्यात यावर सूचक भाष्य करणारे बॅनर्स लागले आहेत.

पुण्यात लागलेले बॅनर्स नेमके कुणी लावले आहेत, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या बॅनर्सवर लिहिणाऱ्याचं नाव ‘कसब्यातील एक जागरूक मतदार’ असं देण्यात आलं आहे. हे बॅनर्स आणि त्यावर मांडण्यात आलेला मुद्दा यामुळे पुण्यात पोटनिवडणुकांवरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या बॅनरवर पिंपरी आणि कसबा पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोथरूड आणि आता कसबा या दोन मतदारसंघांमधील भाजपाच्या उमेदवारीचा उल्लेख केल्याचं सूचित होत आहे. “कुलकर्णींचा मतदारसंघ गेला…टिळकांचा मतदारसंघ गेला.. आता नंबर बापटांचा का???… समाज कुठवर सहन करणार?” असा प्रश्न या बॅनरवर उपस्थित करण्यात आला आहे.पुण्यात कोथरूडमध्ये स्थानिक उमेदवार मेधा कुलकर्णी यांच्या मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. गेल्या निवडणुकीत पाटील निवडून आले असले, तरी मेधा कुलकर्णींचं 1 लाखांचं मताधिक्य पाटलांसाठी 20 हजारांवर आल्याचं दिसून आलं. त्यापाठोपाठ आता कसब्यात मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्या ठिकाणी भाजपाकडून रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

या उमेदवारीवरून ब्राह्मण समाजात खदखद असल्याची भूमिका आनंद दवे यांनी मांडली आहे. ते म्हणाले की, गेल्या वेळी मेधा कुलकर्णी कोथरूडमधून बाद झाल्या आहेत. आता टिळक बाद झालेत. त्यामुळे 21 आमदारांपैकी एकही आमदार असा नाही जो ब्राह्मण समाजाची बाजू घेतो. ब्राह्मण समाजावर जेव्हा आरोप होतात, त्याचं उत्तर ठापपणे देणारा प्रतिनिधी त्या भागात असला पाहिजे असं आमचं मत आहे. उद्या वेगळ्या समाजावर अन्याय झाला असता, तरी आमची हीच भूमिका असती. चिंचवडला न्याय लावला गेला, तोच न्याय टिळक घराण्याला लावला जायला हवा होता. ब्राह्मण समाजात खदखद आहे. भाजपाचे लोक सोशल मीडियावरही जाहीरपणे लिहीत आहेत की हे कुठेतरी चुकतंय. त्याची नाराजी मतदारसंघात कशी दिसेल, याचं चित्र भाजपाच्या लोकांना 2-3 तारखेला दिसेल, असा इशाराही दवे यांनी दिला आहे.