बनावट इ-पासचा सुळसुळाट, कशेड चेकपोस्टला दोन गाड्या पकडल्या

बनावट पास घेऊन रत्नागिरीत येणाऱ्या दोन गाड्या कशेडी चेकपोस्ट येथे खेड पोलिसांनी पकडल्या. लॉकडाऊनच्या काळात आतंरजिल्हा प्रवासासाठी इ- पासची सक्ती केल्यानंतर भामट्यांनी बनावट इ-पास तयार करून फसवणूक करायला सुरूवात केल्याचे उघडकीस आले आहे.
खेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम आणि त्यांचे सहकारी कशेडी चेकपोस्टवर गाड्यांची तपासणी करत असताना एका झायलो गाडीचा इ-पासचा क्युआर कोड स्कॅन केला असता तो पास बनावट असल्याचे निष्पन्न झाले. गाडीचा चालक महमूद वसीम रफ़ीक लालू याने सांगितले की, अज़ीम मंगा हा पास बदलून देतो आणि त्याने बनावट पास तयार करून दिला. पोलिसांनी गाडीतील महमंद वसीम रफीक लालू (रा.उद्यमनगर रत्नागिरी), तन्वीर काझी (रा. कोकणनगर), अंजीम मंगा (रा. गोडबोले स्टॉप रत्नागिरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
त्यानंतर कशेडी येथे मुंबईहून येणाऱ्या एका इनोव्हा कारचा पास स्कॅन केला असता तोही बनावट आढळला. पोलिसांनी वाहनचालक प्रशांत पाटील (43) आणि वाहन मालक अंकित पडीयार (रा. वसई) यांच्यावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता अंकित पडीयार याने पालघर येथील एका इसमाला मोबाईलवर कागदपत्रे आणि 600 रुपये पाठवून बनावट पास तयार करून घेतला.

 

आपली प्रतिक्रिया द्या