
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेड तालुक्यातील कशेडी बोगद्यातील पाण्याचा पाझर आणि गळती अद्यापही थांबलेली नाही. ऐन गणेशोत्सवाच्या काळात कोकणात ये-जा करणाऱ्या कोकणवासीयांना या गळतीमुळे मोठय़ा कसरतीचा सामना करावा लागणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून गळती रोखण्यासाठी करण्यात आलेले सर्व उपाय निष्फळ ठरले असून दोन्ही बोगद्यांमधील सद्यस्थितीत गळती सुरूच आहे.
कशेडी बोगद्याचे काम पूर्णत्वास गेलेले असले तरी बोगद्यातील गळती अव्याहतपणे सुरूच आहे. पावसाळ्यात बोगद्याच्या छतावरून आणि भिंतींवरून पाण्याचे मोठे फवारे उडत असल्याचे चित्र आहे. यामुळे बोगद्याच्या आतील रस्ता निसरडा झाला असून अपघाताचा धोका वाढला आहे.
उपाययोजना निष्फळ
पाण्याचा निचरा योग्य रीतीने न झाल्याने व गळती रोखण्यासाठी केलेले कोटिंगचे काम टिकू न शकल्याने प्रशासनाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन केवळ मलमपट्टी न करता बोगद्यातील गळतीवर तातडीने कायमस्वरूपी आणि ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे.




























































