
किमान दहा वर्षांपासून दहशतवादी लपण्यासाठी वापरत असलेली एक जुनी छावणी सुरक्षा दलाच्या जवानांनी शनिवारी रात्री उशिरा उद्ध्वस्त केली. या ठिकाणाहून जवानांनी दोन एके-47 रायफली, त्याच्या 2 हजार राऊंड गोळ्या, तीन आरपीजी राऊंड्स, दोन वायरलेस सेट आणि एक सॅटेलाइट फोनही जप्त केला आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, 5 दहशतवादी डालरी येथील दाट जंगलात लपले असल्याची खबर मिळताच जवानांनी शोध मोहीम हाती घेतली. त्याचवेळी दहशतवाद्यांच्या या छावणीचा पत्ता लागला. जवान तेथे जाईपर्यंत दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. या छावणीत ते हत्यारे आणि स्फोटके दडवून ठेवत होते.
मोठय़ा हल्ल्याची तयारी
राष्ट्रीय रायफल्स सेक्टर-7च्या कमांडरने घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर जप्त केलेला मुद्देमाल तपासणीसाठी पाठविण्याचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले की, जप्त करण्यात आलेली हत्यारे आणि स्फोटके पाहता हे दहशतवादी हिंदुस्थानात आणखी एखादा मोठा धमाका करण्याच्या तयारीत होते असा संशय आहे. या जप्तीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.
























































