
कोरोना महामारीच्या संकटात रुग्णालयात बेड मिळणे अवघड झाले आहे. बेड मिळाला तर ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची कमतरता भासतेय. या अशा कठीण काळात अनेक लोक माणुसकीच्या नात्याने जमेल तशी मदत कोरोनाबाधितांना करतायत. कश्मीरच्या बडगाम जिह्यातील राहणारे आणि दम्याच्या आजाराने त्रस्त असणारे मंजूर अहमद स्वतः ऑक्सिजन सपोर्टवर असताना कोरोनाबाधितांना ऑक्सिजन सिलिंडर्स पोहचविण्याचे काम करत आहेत.
मंजूर अहमद हे गेल्या तीन वर्षांपासून ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. अशा परिस्थितीतही ते स्वत:चा जीव धोक्यात घालून आपल्या मालवाहू वाहनातून कोरोनाबाधितांना ऑक्सिजन सिलिंडर्स नेऊन देतात. ते केवळ ऑक्सिजन सिलिंडर नेऊन देत नाहीत तर खाली सिलिंडर पुन्हा भरून आणण्यासाठीही मदत करतात. मंजूर यांच्यासारख्या लोकांच्या निःस्वार्थ मदतीमुळे अनेकांचे जीव वाचताहेत.
मला स्वत:ला दम्याचा आजार आहे. जेव्हा सॅचुरेशन लेव्हल कमी होते तेव्हा रुग्णाची काय अवस्था होते याची जाणीव मला आहे. कोरोनाच्या कठीण परिस्थितीत आपल्या हातून काहीतरी चांगले घडतेय याचा मनाला आनंद आहे. वेळेत कोणत्याही बाधितापर्यंत ऑक्सिजन पोहोचवू शकलो, त्याचा जीव वाचवू शकलो किंवा त्याची मदत करू शकलो तर मला चांगले वाटते, असे मंजूर अहमद सांगतात.
- मी ऑक्सिजनचे महत्त्व आणि ते न मिळाल्यास होणारा त्रास जाणतो. त्यामुळे मला शक्य आहे तेवढी मदत करण्याचा मी प्रयत्न करतो. मी माणुसकीच्या नात्याने हे काम करतो. कोरोनाच्या या कठीण काळात सगळ्यांनी हिंमत ठेवा.



























































