“कायापालट” प्रकल्प आरोग्य यंत्रणेच्या उदासीनतेने जिल्ह्यात बारगळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अलिबाग

ग्रामीण भागातील तसेच शहरातील शासकीय आरोग्य संस्था स्वच्छ, सुसज्ज आणि लोकाभिमुख करण्यासाठी “कायापालट” ही महत्वाकांक्षी योजना रायगडात जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी राबविण्याचे ठरविले. मात्र जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या उदासीनतेमुळे जिल्हाधिकारी यांची ही महत्वकांक्षी योजना रायगडात बारगळली आहे.

शासकीय रुग्णालय म्हटलं की अस्वच्छता, टापटीपपणा नसलेले, परिसर अस्वच्छ यामुळे येणाऱ्या रुग्णालाही आनंदी वाटत नाही. याच हेतूने रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कोल्हापूर येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना शासकीय रुग्णालयात पायाभूत सुविधा मिळण्याच्या दृष्टीने “कायापालट” ही योजना प्रायोगिक तत्वावर राबविली. या योजनेअंतर्गत सामाजिक दायित्व मदतीतून कोल्हापूरमधील शासकीय रुग्णालयाचा कायापालट करण्यात आला. कायापालट योजनेमुळे कोल्हापूर शासकीय रुग्णालयातील परिसर, रुग्णालय स्वच्छ व सुंदर झाले. रुग्णांनाही शासकीय रुग्णालयात येताना आनंदी वाटू लागले. त्यानंतर डॉ. विजय सूर्यवंशी यांची ही कायापालट योजना केंद्राने देशात पथदर्शी पद्धतीने राबविली. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला.

रायगड येथे डॉ. विजय सूर्यवंशी जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी कायापालट ही योजना रायगड मध्ये राबविण्याचे ठरविले. यासाठी जिल्ह्यातील असलेल्या कंपन्या, तसेच सामाजिक दायित्वातून मदत करणाऱ्याकडून आर्थिक वा वस्तू रुपात मदत घेऊन ग्रामीण रुग्णालयाचा पायाभूत सुविधांसह कायापालट योजना राबविण्यासाठी आरोग्य यंत्रणेला सांगण्यात आले. मात्र या योजनेला जिल्ह्यात मूर्तरूप देण्यात आरोग्य यंत्रणेला पाहिजे तसे यश मिळालेले नाही. त्यामुळे रायगड जिल्ह्यात कायापालट या योजनेचा आरोग्य अधिकाऱ्याच्या निष्क्रियतेमुळे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी याचा हा महत्वकांक्षी प्रकल्प बारगळला गेला असल्याचे चित्र तयार झाले आहे.

जिल्ह्यात रोहा, खालापूर, महाड या भागात औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. अनेक मोठमोठ्या कंपन्या जिल्ह्यात आहेत. यातील बहुतेक कंपन्या सामाजिक क्षेत्रात आपला हातभार लावत असतात. जेएनपीटी, गोयंका ग्रुप, जेएसडब्लू, दीपक फर्टिलायझर या कंपन्यांनी कायापालट प्रकल्पाला मदत करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. मात्र असे असताना आरोग्य यंत्रणा या कंपन्यापर्यत स्वतःहून पोहचत नसल्याने कायापालट सारखा प्रकल्प जिल्ह्यात यश मिळवू शकलेला नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी स्वतःहून यात पुढाकार घेणे गरजेचे आहे. तरच जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचा हा महत्वकांक्षी प्रकल्प जिल्ह्यात योग्य पद्धतीने कार्यान्वित होऊ शकतो.

काय आहे कायापालट योजना
शासकीय रुग्णालय परिसर स्वच्छ ठेवणे, रंगरंगोटी करणे, रुग्णांसाठी माहिती फलक तयार करणे, परिसरात बगीचा तयार करणे, अत्याधुनिक यंत्रणा रुग्णालयात ठेवणे यासारख्या पायाभूत सुविधा करण्यासाठी कंपनी किंवा सामाजिक दायित्व असणाऱ्या व्यक्तीकडून आर्थिक मदत वा वस्तू घेऊन रुग्णालय सुशोभित करणे हा उद्देश या योजनेचा आहे. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णालाही आनंदी व स्वच्छ रुग्णालयात उपचार घेण्याचा आनंद मिळेल, अशी यामागची कल्पना होती.

जिल्हाधिकारी यांचा महत्वकांक्षी प्रकल्प कायापालट बाबत दोन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी व जिल्ह्यातील कंपनी अधिकारी यांच्यात बैठक झाली होती. त्यानुसार जेएनपीटी, गोयंका ग्रुप, दीपक फर्टिलायझर, जेएसडब्लू या कंपन्यांनी पुढाकार घेतला असून प्राथमिक चर्चा झालेली आहे. त्यामुळे या कंपनीच्या सहकार्यातून कायापालट योजना जिल्ह्यात योग्य पद्धतीने राबविण्यास मदत मिळेल. – डॉ. सचिन देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी, राजीप