एसपी कार्यालयात केबीसी एजंटचा आत्मदहनाचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। हिंगोली

कर्जाला कंटाळून येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात एकाने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र योग्यवेळी पोलिसांनी त्यास ताब्यात घेतल्याने पुढचा अनर्थ टळला आहे. रविवारी दुपारी साडे बाराच्या दरम्यान ही घटना घडली. प्रभाकर नारायण चव्हाण असे या व्यक्तीचे नाव असून तो वसमत तालुक्यातील ब्राम्हणगावचा आहे.

रविवारी दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात प्रभाकरने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. बघता बघता शहरात शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहितीही वाऱ्यासारखी पसरली.यामुळे घटनास्थळी लोकांनी एकच गर्दी केली होती. चव्हाण हा केबीसी कंपनीचा एंजट आहे. अनेकजणांनी प्रभाकरवर विश्वास ठेवून कंपनीत पैसे गुंतवले होते. पण त्याचा परतावा मिळत नसल्याने गुंतवणूकदारांनी पैशासाठी प्रभाकरच्या मागे तगादा लावला होता. यामुळे कंटाळलेल्या प्रभाकरने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, त्याला पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतले असून याबाबत अद्याप कुठलीही नोंद झाली नसल्याचे पोलीस निरीक्षक उदयसिंह चंदेल यांनी सांगितले.